- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता श्रेयासाठी सर्वपक्षीय आटापिटा सुरू झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाल्याचा दावा शिवसेनेने केला असून, त्यासाठी फलकबाजीसह वृत्तपत्रात जाहिरातदेखील दिली आहे. तर, विरोधकांच्या ‘संघर्ष यात्रे’मुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे श्रेयवादासाठीच्या या लढाईत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीही मैदानात उतरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेला मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या पहिल्याच बैठकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला; शिवाय सरसकट कर्जमाफीच्या मागणीला तत्त्वत: मान्यताही देण्यात आली. पहिल्याच बैठकीत सरकारला बळीराजासमोर नमते घ्यावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका वठविण्याचा आटापिटा करणाऱ्या शिवसेनेच्या नेते, आमदारांनी वृत्तपत्रात जाहिरात देत उद्धव ठाकरेंना श्रेय दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याचा दावा करणारी पोस्टरबाजीही शिवसेनेकडून करण्यात येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही कर्जमाफी आपल्यामुळेच झाल्याचा दावा केला आहे. शेतकऱ्यांचा संप, विरोधकांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारला तत्त्वत: सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी अद्याप तसे आदेश निघाले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणी होत नाही आणि सरकट सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आक्रमकच राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.सरकारला श्रेयाचे घेणेदेणे नाहीशेतकरी कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी सर्व पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत असले, पोस्टरबाजी सुरू असली तरी याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सरकारला श्रेयाचे काहीही घेणेदेणे नाही. कर्जमाफीबाबत सर्व राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी श्रेय घ्यावे.