ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या कल्पनेतून साकारलेला शिवाजी पार्क मैदानातील सेल्फी पॉईंट अखेर बंद झाला आहे. रंगीबेरंगी छत्र्या, फुलपाखरांच्या डिझान्सचा हा सेल्फी पॉईंट तरुणाईसह अबालवुद्धांचा आकर्षण ठरला होता. रविवारी संध्याकाळी तर इथे सेल्फी स्टीकने फोटो काढण्यासाठी जत्रा जमायची. कॉलेजला जाणा-या तरुण-तरुणींचा घोळका इथे जमायचा.
सीएसआर फंडाचे कारण देऊन हा सेल्फी पॉईंट बंद करण्यात आला आहे. सेल्फी पॉईंटच्या देखभालीसाठी निधी नसल्याचे कारण मनसेकडून देण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या सेल्फी पॉईंटचे उदघाटन केले होते.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवाजी पार्कमधून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंचा पराभव झाला. मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या स्वप्ना देशपांडेंचा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी पराभव केला. दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. नेहमीच या भागात शिवसेना-मनसेमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असते. त्यामुळे आता शिवसेनेकडून इथे सेल्फी पॉईंट सुरु करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.