मुंबई - सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने धक्कादायकरीत्या पराभव झाला आहे. शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धमासान सुरू झाले आहे. शशिकांत शिंदेंच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली गेली. त्यानंतर शिंदेंनी शरद पवार यांची भेट घेत त्यांची माफी मागितली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या प्रकाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शशिकांत शिंदेंचा पराभव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, दगडफेकीची घटना घडल्यानंतर मी तातडीने साताऱ्याच्या एसपींशी बोललो. दगडफेक करणाऱ्या पाच सहा जाणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी मला सांगितले. कुठलीही निवडणूक म्हटली की यश अपयश हे येतच असतं. सगळेच काही निवडून येत नाहीत. त्यातही सहकारातील निवडणूक ही पक्षीय चिन्हांवर लढवली जात नाही. साताऱ्यात झालेल्या निवडणुकीतील पॅनेलमध्येही दोन्हीकडचे लोक होते. त्यामुळे निवडणूक म्हटली की विजय पराभव हा ओघानेच आला, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज सकाळी हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एक मताने धक्कादायक पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला. ज्ञानदेव रांजणे यांनी जावळीतून ही निवडणूक लढवली होती. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी आणि शशिकांत शिंदे यांच्याच समर्थकांनी ही दगडफेक केली होती. त्यामुळे, आमदार शशिकांत शिंदे यांनी दगडफेकीबद्दल माफी मागितली होती.
त्यानंतर शशिकांत शिंदे म्हणाले होते की, माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. तसेच, माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रयत्न केले. पण, मी एका मताने पराभूत झालो, तो पराभव मी स्वीकारतो, असेही शिंदेंनी म्हटलं आहे. ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, शरद पवार यांनाही ते माहिती आहे. मी एकनिष्ठ कार्यकर्ता असून त्यांच्यासाठी जीव देईन, असे म्हणत आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.