महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणिभाजपा नेत्यांमध्ये ट्विट वॉर रंगले आहे. त्यात आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करत एक ट्विट केले होते. मात्र चौफेर टीकेनंतर त्यांना हे ट्विट डिलीट करावे लागले होते. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनी आव्हाड यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
महापुरुषांच्या अपमानाचा मुद्दा गाजत असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता, असं विधान केल्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट करून भाजपावर पलटवार केला होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली, असा दावा आव्हाड यांनी या ट्विटमधून केला होता. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत स्पष्टिकरण दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर ते ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली होती.
हा फोटो ट्विट केल्यानंतर आपल्या नेत्यांनी औरंगजेबाच्या नाहीतर स्थानिक पिराच्या दर्ग्यावर फुले वाहिल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच या मुद्द्यावरून सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो डिलीट केला होता. दरम्यान, आव्हाड यांनी ट्विट डिलीट केल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी जितेंद्र आव्हाड यांची खिल्ली उडवली आहे. आम्ही अनेकदा महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांविरोधात ट्विट केले. मात्र काही झालं तरी आम्ही ट्विट डिलीट केलं नाही, असा टोला कंबोज यांनी आव्हाड यांना लगावला आहे.