मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यानंतर गोव्यात असलेल्या सर्व बंडखोर आमदारांनी मोठा जल्लोष करत झिंगाट डान्स केला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचे षड्यंत्र असल्याचा दावा अनेकांकडून केले जात होता. मात्र, सत्ता संघर्षाच्या आठवडाभरानंतर भाजपने यात उडी घेऊन बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पत्र दिले. त्यानंतर राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक सिद्ध करण्यास सांगितले. यानंतर सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटीहून गोव्याला येण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील ताज कन्व्हेशन सेंटर या हॉटेलमघ्ये सर्व बंडखोर आमदार दाखल झाले.
गोव्यातील हॉटेलमध्ये आमदारांचा मोठा जल्लोष
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करताच गोव्यातील बंडखोर आमदारांनी एकच जल्लोष केला. एकनाथ शिंदे यांच्यासाठी यापूर्वी एक खास गाणे तयार करण्यात आले होते. याच गाण्यावर सर्व आमदारांनी ठेका धरला. काही आमदार अगदी टेबलावर चढून झिंगाट डान्स करताना दिसले. बंडखोर आमदारांनी केलेल्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर व्हिडिओ कॉलिंगद्वारे शिंदे गटातील सर्व आमदार आणि सहयोगी आमदारांच्यासोबत ऑनलाइन संवाद साधला.देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा करून एकाच दगडात अनेक पक्षी मारत मास्टरस्ट्रोक खेळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दररोज सावरकरांचा अपमान, हिंदूंचा अपमान केला जात होता. शेवटच्या दिवशी नामांतराचा ठराव झाला. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यानंतर औरंगाबद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबाद शहराचे धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला. गेल्या दीड वर्षांत यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. बहुमत चाचणीचे निर्देश देण्यात आल्यावर कोणतीही मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही. तरीही ती घेण्यात आली. या प्रस्तावाला आमचे समर्थन आहे. मात्र, नव्याने येणाऱ्या सरकारला पुन्हा याचे निर्णय घ्यावे लागतील. कारण आधीचे निर्णय वैध नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.