अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले, 'महायुतीत धुसफुस नाही, खूशखूश आहे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 05:26 IST2025-04-14T05:26:09+5:302025-04-14T05:26:34+5:30
Mahayuti News: अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाकडून निधी वाटपात शिंदेसेनेच्या मंत्र्यांना डावलले जात असल्याची शिंदे यांची प्रमुख नाराजी होती.

अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले, 'महायुतीत धुसफुस नाही, खूशखूश आहे'
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. शिंदेसेनेला डावलले जात असल्याची तक्रार शिंदे यांनी शनिवारीच केली होती. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर सविस्तर चर्चा झाली. ‘महायुतीसाठी तुम्ही जो त्याग केला आहे आणि योगदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही,’ अशा शब्दांत शाह यांनी शिंदे यांना आश्वस्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाकडून निधी वाटपात शिंदेसेनेच्या मंत्र्यांना डावलले जात असल्याची शिंदे यांची प्रमुख नाराजी होती. शाह यांनी निधी वाटपात दुजाभाव केला जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचे समजते.
याशिवाय रायगडचे पालकमंत्रिपद आपल्या पक्षाला मिळावे, अशी मागणी करतानाच यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याची तक्रारही शिंदे यांनी शाह यांच्याकडे केल्याचे समजते.
तीन दिवसांत तिसरी भेट
मागील तीन दिवस शाह राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शिंदे यांची शाह यांच्याबरोबरची ही तिसरी भेट आहे. यापूर्वीच्या भेटीत दोघांमध्ये चर्चा झाली नव्हती. त्यामुळे रविवारी खास वेळ घेऊन शिंदे शाह यांना भेटायला गेले.
बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. नाराजी दूर करण्यासाठी शाह यांनी शिंदे यांना खास भेटीची वेळ दिल्याची चर्चा आहे.
महायुतीत धुसफुस नाही खूशखूश आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत, काम करणारे लोक तक्रारीचे रडगाणे गात नाहीत. आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत, असेल काय ते बसून चर्चेतून सगळे सुटणार.
-एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री