ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच बिहारमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यामुळे कृषिमालाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याचा आणि परिणामी महागाई वाढण्याचा धोका असल्याची भीती कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे. याचा अनुभव महाराष्ट्रात आत्ताच आला असून लासलगावमध्ये येणारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे वृत्त आहे. परिणामी कांद्याचा भाव होलसेल बाजारात किलोला ५० रुपये तर किरकोळ बाजारात ६० रुपये झाला आहे. अशीच परिस्थिती राहीली तर कांदा ७० रुपये किलोपेक्षा महाग होण्याची शक्यता आहे.
अनेक कृषिप्रधान परीसरामध्ये अवघा १९ टक्के पाऊस पडला असून यानंतरच्या राहिलेल्या मोसमात फारसा फरक पडण्याची चिन्हे नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येत्या महिन्याभरात चांगला पाऊस पडला तरीही एकंदर देशात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पावसाचा अंदाज आहे. परिणामी मोदी सरकारला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात पडलेल्या खनिज तेलाच्या भावांनी महागाई कमी ठेवण्यासाठी मदत केली होती, जी आता पुरेशी पडणार नाही अशी चिन्हे आहेत.
केंद्राने गेल्या आठवड्यात कृषिक्षेत्रासाठी ३०० कोटी रूपयांचं रिलीफ पॅकेज जाहीर केलं आहे. त्यात डिझेल आणि बियाण्यांसाठी अनुदान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही दुष्काळग्रस्त शेतक-यांना कर्जमाफीसारख्या योजना देण्यात याव्यात यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.