मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा वादात अडकल्या आहेत. शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी सुळेंचा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यात आधी मटण खाल्लं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी महादेवाचं दर्शन घेतले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मटण खाल्यानंतर भैरवनाथ मंदिर, महादेव आणि संत सोपानकाकांचे दर्शन घेतल्याचा आरोप सुप्रिया सुळेंवर केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यावर सुप्रिया सुळेंकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पोस्ट करत सुप्रिया सुळेंच्या या कृत्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं आहे. शिवतारेंनी सुप्रिया सुळेंचा मटण खाताना व्हिडिओ, मंदिरात घेतलेले दर्शन याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट केलेत. या आरोपामुळे काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळे जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात सक्रीय आहेत. मतदारसंघात फिरताना त्या स्थानिकांशी संवाद साधतात. हा पुण्याचा व्हिडिओ असल्याचं बोलले जाते. विजय शिवतारेंनी म्हटलंय की, आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला अशी टीका त्यांनी केली.
वडिलांकडून हिंदू धर्म शिकावा - आनंद दवेहिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा या शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंनी शिकायला हव्यात. मी नॉनव्हेज खाल्लंय असं म्हणून मंदिरात जाणार नाही असं म्हणणाऱ्या पवारांची मुलगी सुप्रिया सुळे नॉनव्हेज खाऊन जाणुनबुजून मंदिरात जात दर्शन घेतात. फोटो काढतात. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचं काम मुद्दामाहून राष्ट्रवादीकडून सुरू आहे असा थेट आरोप हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केला.