नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय...

By प्रविण मरगळे | Published: July 6, 2023 01:40 PM2023-07-06T13:40:18+5:302023-07-06T13:41:22+5:30

राजकीय नेते म्हणून तुम्ही चुकला नाहीत, तर मतदार म्हणून आमची चूक झालेली आहे, अशी उद्विग्नता आज आमच्या मनात आहे.

After Eknath Shinde, Ajit Pawar rebels An article on the current political situation in Maharashtra as a voter | नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय...

नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय...

googlenewsNext

हॅलो, नमस्कार मी एक मतदार बोलतोय, तुम्ही ओळखलं नसेलच. कारण आपल्याला भेटून पाच वर्षं होत आली. मतांसाठी तुम्ही आमचे उंबरठे दर पाच वर्षांनी झिजवता, पण याच मतदाराला आज तुमच्या लेखी काहीच किंमत उरली नाही. पक्षीय विचारधारा, धोरणे, आमच्या भागाचा विकास या गोष्टींचा  विचार करून आम्ही तुम्हाला मतदान करत असतो. परंतु, सध्याचं राजकारण बघता आम्ही मतदान करावं की नाही, हाच प्रश्न आमच्या मनाला पडलाय.

सत्तेच्या लोभापायी, खुर्ची टिकवण्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही इकडून तिकडं उड्या मारता. कधी सत्तेत तर कधी विरोधात, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष तुम्ही एकमेकांसोबत सलोख्याने राहता. परंतु, तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नेत्याच्या सांगण्यावरून स्वतःची माथी भडकवत एकमेकांची डोकी फोडतो. खरंतर आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो आमच्या देशात लोकशाही आहे. इथं जनताच मालक आहे. मालक नव्हे तर आम्हाला मतदारराजा म्हटलं जातं. परंतु निवडणुकीनंतर याच राजाला तुम्ही महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसवता. समोर कितीही बेबंदशाही माजली असली तरी मतदार म्हणून आम्ही हतबलच असतो.

महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी लढाई होती. आम्ही मतदार म्हणून मतदानाचे कर्तव्य बजावलं. निकालात शिवसेना-भाजपाला बहुमत मिळालं. परंतु, त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेला खेळखंडोबा पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. आधी ८० तासांचे 'भाजपा-राष्ट्रवादी' सरकार, नंतर 'शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी' सरकार पाहिलं. अडीच वर्षांचा हा काळ लोटल्यानंतर पुन्हा शिवसेना शिंदे-भाजप आणि आता 'राष्ट्रवादी अजित पवार - एकनाथ शिंदे शिवसेना - भाजपा' असं सरकार पाहायला मिळत आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राच्याराजकारणाचा चिखल झालाय, हे बघून प्रचंड त्रास होतो. राजकीय नेते म्हणून तुम्ही चुकला नाहीत, तर मतदार म्हणून आमची चूक झालेली आहे, अशी उद्विग्नता आज आमच्या मनात आहे.

'राजकारण' या शब्दाचाच मतदार म्हणून आम्हाला कीव यायला लागलाय. केवळ म्हणण्यासाठी 'राजा' असलेला हा मतदार तुमच्या दृष्टीने केवळ एक 'प्यादं' बनून राहिलाय. खरं तर, आज तुम्हाला फोन करताना मनात नेमकी कुठली भावना आहे सांगू शकत नाही. राग, हतबलता, लाज, वैताग, चीड असं सगळंच दाटून आलंय. म्हटलं तुम्हाला आमचा विसर पडला आहे का हे बघून घ्यावं. तुमचं काय हो, तुमच्या सात पिढ्या बसून खातील इतकं कमावलं आहे. आम्ही मतदार काय रोज सकाळी उठायचं, जेवणाचा डबा घ्यायचा खचाखच भरलेल्या ट्रेनमधून कामाला जायचं. अहो, हल्ली आमच्या रेल्वेच्या डब्यातही तुमचाच विषय असतो. आज हा इकडे गेला, उद्या त्यांनी तिकडे उडी मारू नये म्हणजे झालं. राजकारणात काही होऊ शकत म्हणा. आम्ही मतदार काहीच करू शकत नाही. 

साहेब, होय तुम्ही सेवक असलात तरी तुम्हाला 'साहेबच' म्हणावं लागेल. कारण तुम्ही राजकीय नेते आहात. आपणास एक विनंती करतो की, मतदार म्हणून आमचाही जरा विचार करा. तुम्ही चूक आहात की बरोबर, निर्दोष आहात की दोषी हे जनतेच्या न्यायालयात येऊन विचारा. ही धमकी नाही. 'बिच्चारा मतदार' काय धमकी देणार हो. पण तुमच्यात धमक आहे, असं तुम्ही सगळीकडे सांगत असता, ती आम्हालाही बघायची आहे. येताय ना?... आम्ही वाट बघतोय!

Web Title: After Eknath Shinde, Ajit Pawar rebels An article on the current political situation in Maharashtra as a voter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.