ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातांची संख्या वाढतच चालली असून असंख्य निरपराधांना आपला जीव गमावावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच, म्हणजे रविवारी पहाटे शिवकर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातातही १७ जण ठार झाले. हे सर्व अपघात रोखण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठविण्याची मोहीम हाती घेतली. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तर सर्व चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांसोबत एक्स्प्रेस-वे बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावे सोशल मीडियावर एक पोस्टही फिरत होती.
याच पार्श्वभूमीवर शरद पोंक्षे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्या या मोहिमेला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आत्तापर्यत ३००-३५० मेल आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी लवकरच या प्रश्नावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या मुद्यावर गेल्या काही वर्षांपासून मोहिम राबवणारे तन्मय पेंडसे हेही याप्रश्नी मुख्यमंत्री व एकनाथ खडसेंची भेट घेणार आहेत.
हे अपघात रोखण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन हे पाऊल उचलले असून त्याला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ९ तारखेला मी एकनाथ शिंदेना भेटून या प्रश्नावर सविस्तर चर्चा करणार आहे, मात्र आत्ताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार ते स्वत: हा मुद्दा मार्गी लावण्यास प्राधान्य देणार आहेत व त्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यायला हवा असे मला वाटते. तोपर्यंत आंदोलन करण्यात अर्थ नाही, असेही पोंक्षे यांनी म्हटले.
काय होती शरद पोंक्षेची पोस्ट ?
पाठोपाठ मेसेज पाठवतोय त्याला कारण ही तसच आहे. काल सातत्यानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडीचे पंक्चर काढत असताना पुन्हा २० माणसं हकनाक मेली. प्रशासन काहीही करायला तयार नाही. तुम्ही साथ दिलीत तर तन्मय पेंडसे गेले कित्येक वर्ष ह्या संदर्भात काम करतोय त्यांचे हात बळकट करुया. मी माझा ईमेल देतो. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या नावानं खरमरीत शब्दात एक पत्र लिहा. सामान्यांच्या भावना पोचुदेत. त्याखाली तुमचा ईमेल व फोन नं द्या, अशी पत्र १०००० तरी जमावीत अशी अपेक्षा आहे. मग मी पुढाकार घेऊन तन्मय सोबत मुख्यमंत्र्यांना भेटेन व त्यांना १५ दिवसाच्या आत कारवाही करायला विनंती करेन.
जर तस झालं नाही तर अख्खी सिने नाट्य सृष्टी एक्सप्रेस हायवेवर ऊभी करु. व जोपर्यंत हायवे सुरक्षीत होत नाही तोपर्यंत एकही गाडी जाऊ द्यायची नाही. मग टोल रुपात मिळणारा करोडो रुपयांचा मलीदा बंद होईल. नट नट्या आल्या की मिडीया नक्कीच येईल, त्यांचा टिआरपी वाढेल. तेव्हा प्लीज माझ्या मागे ऊभे रहा. एक गोष्ट लक्षात ठेवा ऑलरेडी खुप उशीर झालाय,अजून होऊ नये म्हणुन एकत्र येऊया. पुढाकार मी घेईन. जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटेन ते कळवेन वेळ असेल त्यांनी या. आधी साम दाम दंड मग भेद. या मार्गानं जाऊ. पण उपोषण आजीबात नाही. नाहीतर भविष्यात तुम्हाला स्वतःला किंवा आप्तेष्टांना हायवेवर मृतावस्थेत बघावं लागेल. अपघात सांगून होत नाहीत. माझा ईमेल ponkshesharad@gmail.com जास्तीत जास्त लोकांना मेल करायला सांगा १५ जून पर्यंत मेल येतील ते घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटेन जे जे येतील त्यांना सोबत घेऊन.
धन्यवाद
भारत माता की जय
शरद पोंक्षे.