मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, यानंतर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांचा फोटो शेअर केला आहे. तसंच त्याला काम फत्ते असं कॅप्शन देत डिवचण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र भाजपनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील निवडणूक आयोगाचे आभार मानत सत्याच्या विजय झाल्याचं म्हटलं. “आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा विचार आहे. जे कोण आज बोलतायत त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं. त्यांना ही मोठी चपराक आहे. जेव्हा त्यांच्या बाजूनं निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असं म्हटलं जातं. ही दुटप्पी भूमिका घेतायत त्यांना त्यांची जागा निकालानं दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “त्यांनी यापूर्वीच घनुष्यबाण गोठवलं जाईल असं म्हटलं होतं. परंतु २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आहे,” असंही ते म्हणाले.