मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेल्या गुलाब चक्रीवादळाने मुंबईसह महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला असतानाच आता त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आता अरबी समुद्राकडे सरकत असतानाच बुधवारी सकाळी मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला. तर अरबी समुद्रात दाखल झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर शाहीन नावाच्या चक्रीवादळात होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानकडे सरकेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
बुधवारी सकाळी मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. विशेषत: भल्या पहाटेच पाऊस दाखल झालेल्या पावसाने सकाळी नऊच्या सुमारास विश्रांती घेतली. पण त्यानंतर पुन्हा दुपारी १२ वाजता जोर पकडला. त्यानंतर पाऊण-एक वाजेपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी पावसाने आपला रौद्र अवतार कायम ठेवला. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. परिणामी सर्वत्र उन्हाने आपली जागा सायंकाळपर्यंत व्यापली होती. दरम्यान, सायंकाळनंतरदेखील पाऊस गायब झाल्याने मुंबईकरांनी किंचित मोकळीक मिळाली होती.
हवामानाचा अंदाज३० सप्टेंबर : कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.१ ऑक्टोबर : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.२ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.३ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
गुलाब चक्रीवादळाच्या कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष गुजरात आणि खंबातच्या आखातावर आहेत. ३० सप्टेंबर रोजी याचे रूपांतरण आणखी तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल. शुक्रवारी याचे रूपांतर शाहीन चक्रीवादळात होईल. हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकेल. - कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग