Maharashtra Assembly Elections ( Marathi News ) : काही दिवसातच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सध्या जम्मू-कश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुका सुरू आहेत. यानंतर निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या निवडणुका जाहीर करणार आहे, या संदर्भात निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोग महाराष्ट्रात दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून तयारीचा आढावा घेणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये एका टप्प्यातील मतदार पार पडले असून असून दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे, तर हरियाणात ५ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात सर्व जागांवर मतदान होणार आहे.तर दुसरीकडे आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची तयारी सुरू केली आहे. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक या आठवड्यात झारखंड आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांचा समावेश असलेली समिती २३-२४ सप्टेंबर रोजी झारखंडला भेट देणार आहेत. त्यानंतर २७ आणि २८ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानुसार त्या तारखेपूर्वी निवडणुका पूर्ण होणार आहेत. यामुळे आता आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
निवडणूक आयोगाने अजून या दोन राज्यांच्या निवडणुकांबाबत काहीही जाहीर केलेले नाही. या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाचवेळी होणार आहेत. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता, मात्र यावेळी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुका एकाच वेळी घेणार नसल्याचे म्हटले आहे. जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी १८ सप्टेंबरपासून तीन टप्प्यात मतदान सुरू झाले, तर पुढील दोन टप्प्यात २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा होणार
निवडणूक आयोगाच्या आढावा दौऱ्यानंतर १५ किंवा २० दिवसांनी निवडणुका जाहीर केल्या जातात. यासोबतच विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वी निवडणूक प्रक्रियाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे आणि वेळेवर नवीन विधानसभेच्या स्थापनेसाठी नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात निवडणूक निकाल लागणे आवश्यक आहे. दरम्यान,ऑक्टोंबर महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर झारखंड विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ ५ जानेवारीपर्यंत आहे.