सातारा : चार पिढ्यांपासून अब्जावधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गानसम्राजी लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर समाजमन गहिवरुन आले. त्यानंतर करोडो चाहत्यांनी त्यांचा इंटरनेटवर शोध घेतला. देश विदेशातील संगीतप्रेमींनी लतादीदींची माहिती घेण्याबरोबरच त्यांची छायाचित्रे आणि स्टेटससाठी त्यांची गाणी ठेवण्यासाठी सर्वाधिक सर्च केले गेले. यासाठी रविवारी सकाळी दहा ते साडेअकरा या कालावधीत सर्वाधिक लोकांनी भेट दिल्याचे समोर आले.
गंधर्वकन्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू अवघ्या जगावर होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्याची खात्री करून घेण्यासाठी नेटकरी सरसावले. भारतासह मॉरिशिस, नेपाळ, दुबई, त्रिनीदाद, पाकिस्तान, बांगलादेश, कतार, ओमन आणि श्रीलंका या देशांमध्ये लतादीदींची माहिती सर्वाधिक सर्च केली गेली.
सुटी मिळणार का म्हणूनही उत्सुकता-
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली. ही सुट्टी आपल्याला लागू होतेय का? हे पाहण्यासाठीही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘हॉलिडे फॉर लता’ असे सर्च केले. याबरोबरच नेटकऱ्यांनी ‘मेरी आवाज ही मेरी पहेचान’ हे गाणे सर्वाधिक डाऊनलोड केले तर भारतीय सेनेसाठी ३० मार्च २०१९ मध्ये गायलेले ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ त्यांचे शेवटचे गाणेही खूप सर्च झाले.
पंतप्रधान आणि प्रार्थनाचा फोटो सर्वाधिक शेअर-
गानसम्राजी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचे छायाचित्र सर्वाधिक शेअर केले गेले. अंत्यविधी झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खान याचा फातेहा पडतानाचा आणि त्याच्याच शेजारी प्रार्थनेसाठी हात जोडलेला फोटो रात्री उशिरापर्यंत जबरदस्त व्हायरल झाला.
असे झाले सर्च-
- लता मंगेशकर
- लता मंगेशकर लेटेस्ट न्यूज
- लता मंगेशकर निधन
- लता मंगेशकर के गाने
संगीताला कशाचेही बंधन नसते हे लतादीदींच्या निधनानंतर ट्रेन्ड झालेल्या माहितीवरून स्पष्ट होते. देश-विदेशाबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या वॉलवर व्यक्त केलेल्या भावना हेच रविवार आणि सोमवार सकाळपर्यंत समाजमाध्यमांमध्ये पहायला मिळाले.
- आदित्य यादव, आयटीतज्ज्ञ, सातारा