४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 12:01 PM2024-05-05T12:01:09+5:302024-05-05T12:02:31+5:30
Ajit pawar Vs Shriniwas Pawar : सुळेंच्या प्रचारात असलेला एकही पवार ४ जून नंतर दिसणार नाही, जर दिसला तर मी माझ्या मिशा काढेन, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा खूपच महत्वाचा मानला जात आहे. बारामती, माढा, मावळसह रत्नागिरी-सिंधुदूर्ग असे राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. आज या मतदारसंघातील प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. अशातच शेवटच्या दिवशी हे नेते जेवढे होईल तेवढे आरोप-प्रत्यारोप करणार आहेत. बारामतीत काका-पुतणे, सून-मुलगी, सख्ख्या भावांत जुंपली आहे. ४ जूननंतर अजित पवार मिश्या काढून फिरणार आहेत, असे जोरदार प्रत्यूत्तर श्रीनिवास पवार यांनी दिले आहे.
अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंसोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर शनिवारी आव्हान देणारे वक्तव्य केले होते. सुळेंच्या प्रचारात असलेला एकही पवार ४ जून नंतर दिसणार नाही, जर दिसला तर मी माझ्या मिशा काढेन, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. एबीपी माझा व टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
अजित पवारांची आई देखील या पवार कुटुंबातील वादावर नाराज असल्याचे श्रीनिवास पवार यांनी केला आहे. माझा मुलगाही तेवढाच प्रिय जेवढे दीर, असे तिचे म्हणणे आहे. मला दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे तिचे मत असल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले. यांच्यामुळे ती बारामती सोडून पुण्यात बहीणीकडे रहायला गेली असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच अजित पवारांनी टोकाची भुमिका घेतल्याने मी त्यांची साथ सोडल्याचे पवार म्हणाले.
२०१९ मध्ये अजित पवारांना शरद पवारांनी भाजपशी चर्चा करण्यास सांगितले होते, अशी कबुली त्यांनी दिली. परंतु त्यांना चर्चा कर आणि शपथविधी करण्यास सांगितला नव्हता. प्रत्येक पक्षात अशी चर्चा करण्याचे अधिकार ठराविक नेत्याकडे दिले जातात. राष्ट्रवादीत हा अधिकार अजितदादांना दिला होता. जर शपथविधीचा निर्णय शरद पवार यांचा असता तर त्यांनी सरकार पडू दिले नसते. त्यांनी म्हटले असले ठीक आहे, झाले ते झाले आता पुढे जाऊया. यामुळे हा निर्णय नक्कीच शरद पवारांचा नव्हता, असा दावा श्रीनिवास पवार यांनी केला.