ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 30 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणात अडकले आहेत. कोणाकडून पैसे घेतले तरी हरकत नाही; परंतु मते फक्त भाजपला द्या, असे आवाहन पर्रीकर यांनी केले होते. या प्रकरणात गोवा फॉरवर्ड पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे सोमवारी तक्रार दाखल झालेली आहे. पर्रीकर यांनी रविवारी सांताक्रुझ मतदारसंघात छोटेखानी प्रचार सभेत भाजपला या भागातून निवडून आणण्याचे आवाहन केले होते. कोणीही रॅलीत सहभागासाठी ५०० रुपये दिले तरी ते घेण्यास काहीच हरकत नाही; परंतु मतदानाच्यावेळी मात्र मत कोणाला द्यायचे ते पक्के ध्यानात असू द्या, असे पर्रीकर यांनी म्हटले होते. गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी तक्रार केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली. तक्रारीसोबत पर्रीकर यांच्या भाषणाची सीडीही जोडली आहे. या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदविण्याबरोबरच कामत यांनी भारतीय निवडणूक आयोगालाही ई-मेलद्वारे तक्रार पाठविली आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाच्या सभेत अरविंद केजरीवाल यांनीही अशाच प्रकारची वक्तव्ये केली होती. भाजप आणि कॉँग्रेसकडून पैसे घ्या; परंतु आम आदमी पार्टीलाच निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर भाजपने तक्रार दाखल केल्यामुळे निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना नोटीस बजावली होती आणि नंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचाही आदेश दिला. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या बाबतीतही तोच न्याय लावल्यास हे प्रकरण पर्रीकर यांना महाग पडण्याची शक्यता आहे.