मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीएच्या नेतृत्वातील महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. जागावाटपाबाबत भाजपा-मनसे यांच्यात चर्चा सुरु असल्याचं पुढे आलं. त्यात मनसेनं राज्यातील २० जागांची मागणी केली आहे. त्यात बहुतांश जागा मुंबई आणि ठाणे परिसरातील आहेत.
या २० जागांमध्ये वरळी, माहिम-दादर, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुण्यातील एका जागेचा समावेश आहे. मनसेकडून वरळी विधानसभेला आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तर नितीन सरदेसाई माहिम-दादर, शालिनी ठाकरे वर्सोवातून निवडणूक लढू शकतात. अनेक वृत्त वाहिन्यांनी ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
भाजपानेही विधानसभेच्या जागांसाठी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ज्या राज्यात मोठा झटका बसला त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. याठिकाणी २३ जागांवरून भाजपा ९ जागांवर घसरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला धोक्याची घंटा वाजली आहे. आव्हाने आणि कमतरता ओळखून भाजपा पुढील रणनीती बनवण्यासाठी १४ जूनला मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, मनसेकडून गेल्या २ लोकसभा निवडणुका लढवण्यात आल्या नाही. २००९ मध्ये मनसेला लोकसभा निवडणुकीत लाखो मते मिळाली होती. त्यानंतरच्या विधानसभेत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाचा आलेख सातत्याने घसरत गेला. त्यात मागील २०१९ आणि यंदाची २०२४ ची लोकसभा निवडणूक मनसेकडून लढवण्यात आली नाही. २०१४ आणि २०१९ या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ १ जागेवर यश मिळालं. गेल्या १८ वर्षापासून मनसेनं स्वबळावर राज्यातील निवडणूक लढवली होती. मात्र आता मनसे युतीत लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेला यंदाच्या निवडणुकीत कितपत फायदा होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. काही महिन्यांवर राज्यात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.