मुंबई, दि. 20 - दीर्घकालीन विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रात पुनरागमन केलं आहे. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात विश्रांती घेतलेल्या पावसाने, ऑगस्टच्या उत्तरार्धात पुनरागमन केल्याने, बळीराजाला दिलासा मिळाला आहे.दुष्काळाचे ढग दाटलेल्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मात्र दोन महिन्यांनी रिपरिपच झाली. पावसाअभावी मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक पिके जळाली आहेत. मराठवाड्यात शनिवारी पावसाने जमीन काहीशी ओली झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, वैजापूर, पैठण तालुक्यांत भूरभूर होती. बीड जिल्ह्यात 63 पैकी 35 महसूल मंडळात अतिवृष्टी, वार्षिक सरासरीच्या 49.15 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात हलक्या सरी झाल्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली येथेही वरुणराजाने हजेरी लावली. विदर्भात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे 104.20 मिमी, चंद्रपूरमधील नागभीड येथे 117.40 मि.मी. व गडचिरोलीतील भामरागड येथे 71.10 मि.मी. पावसाची नोंद झाली.कुठे झाला पाऊस....- नांदेड जिल्ह्यात 16 पैकी 12 तालुक्यात अतिवृष्टी, जिल्ह्यात 24 तासात सरासरी 100 मिमी, तर शहरात विक्रमी 144 मिमी पावसाची नोंद. महापालिका आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात पाणी घुसलं, निम्मं शहर जलमय- अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशकात पावसाचं आगमन, काल रात्रीपासून संततधार सुरु, धरण क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरी, गंगापूर धरणातून 11 वाजता 2 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होणार, तर दारणा धरणातूनही 1100 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग- सोलापूर शहर व परिसरात रात्रभर पाऊस, पावसाची संततधार सुरूच, सूर्यदर्शन नाही- शिर्डीतही पावसाची संततधार- अहमदनगर : नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. रविवारी सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पिके सुकू लागली होती. यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर असतानाच शनिवारी रात्री भीज पावसाला सुरुवात झाली. रात्रभर हा भीज पाऊस सुरु होता. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. जामखेडला सर्वाधिक 87 मिमी पावसाची नोंद झाली. तर पारनेरला 82 मिमी आणि पाथर्डी, कर्जतला 63 मिमी पाऊस पडला. त्याखालोखाल शेवगाव 53, श्रीगोंदा 45 मिमी, नगर 43, नेवासा 37, राहुरी 29 मिमी पावसाची नोंद झाली. श्रीरामपूर 19, अकोले 15, संगमनेर 10 आणि कोपरगावला 7 मिमी पाऊस पडला. यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.- ७२ दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर इंदापूर तालुक्यात रात्रभर जोरदार सततधार पाऊस ..जीरायती भागातील शेतकऱ्यांत समाधान ...दुष्काळजन्य परिस्थितीवर अखेर पावसाने केली मात..- वाशिम जिल्ह्यात सकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंत जोरदार पाऊस- अकोला जिल्ह्यात रात्रभरात सरासरी १७.४३ मिमी पावसाची नोंद- कल्याण-डोंबिवलीत रात्रभर पावसाची रिपरिप सुरू, अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पट्ट्यातही रात्रभर पाऊस, कुठेही पाणी साचण्याची घटना नाही, रेल्वे सेवा अद्याप सुरळीत, रस्ते वाहतुकीलाही काही फटका नाही.
इशारा : २० आॅगस्ट : कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
माळीणसारखी घटना घडू शकतेमाळीण गाव मुसळधार पावसामुळे रातोरात नष्ट झाले होते. पनवेल तालुक्यातील बारवाडा गावात डोंगर खचल्याने तशाच प्रकारची घटना घडू शकते. गावात डोंगरालगत ३० ते ४० घरे आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या ठिकाणी माळीणची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. तत्पूर्वी प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.