पिंपरी : शहरात दहशत माजविणाऱ्या महाकाली टोळीच्या म्होरक्याचा डिसेंबर २०१० मध्ये देहूरोड पोलिसांनी एन्काउंटर केला. त्यानंतर महाकाली टोळी संपुष्टात आली, असा समज झाला असताना, गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडतच राहिले. त्या वेळी महाकाली टोळीशी संबंधित असलेल्या गुंडांनी रावण साम्राज्य टोळी तयार केली आहे. चिंचवड, देहूरोड, खडकी आणि ग्रामीण भागात नंग्या तलवारी, चॉपर, रॉड अशी घातक शस्त्रे घेऊन खुले आम वावरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे.हुक्का पार्लर, मटक्याचे अड्डे या ठिकाणाहून रोकड लुटायची अशी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या वाल्हेकरवाडी, रावेत परिसरातील रावण साम्राज्य टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने गजाआड केले. त्यामध्ये अनिकेत राजू जाधव (वय २१, जाधववस्ती, रावेत) हा रावण साम्राज्य टोळीचा प्रमुख सूत्रधार आहे. या टोळीप्रमुखासह विनोद निजाप्पा गायकवाड (वय २२, वाल्हेकरवाडी), रवी काशिनाथ अशिंगळ (वय २०, रा. धर्मराज चौक, रावेत), अविनाश राजेंद्र जाधव (वय २४, रा. जाधववस्ती रावेत), सागर सीताराम जाधव (वय २६, रावेत), अरिफ शमशुद्दीन शेख (वय २६, वाल्हेकरवाडी) या त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानकाजवळ त्यांना ताब्यात घेतले. दोन गावठी कट्टे, तीन काडतुसे, कोयता, तलवार आदी घातक शस्त्र आणि मोबाइल, मोटार असा एकूण ५ लाख ७९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे. रावण साम्राज्य टोळीतील काही गुन्हेगार पूर्वी महाकाली टोळीत कार्यरत होते. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०११ला महाकाली टोळीचा प्रमुख महाकाली उर्फ राकेश फुलचंद ढकोलिया याचा एन्काउंटर झाला. त्यानंतर महाकाली टोळीतील काही सदस्यांनी पुढाकार घेऊन रावण साम्राज्य अशी स्वतंत्र टोळी तयार केली आहे. (प्रतिनिधी)ग्रुपमधूनच गुंडगिरीचे बाळकडूशहराच्या विविध भागांत विशेषत: झोपडपट्टी परिसरात वेगवेगळ्या नावाने अल्पवयीन मुलांचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. हे ग्रुप भाईगिरीत सक्रिय असून कोणत्या ना कोणत्या गुंडांशी संलग्न कार्यरत आहे. एखाद्या गुंडाचा वाढदिवस असेल तर जाहिरात फलकांवर ठिकठिकाणी या ग्रुपमधील मुलांचे फोटो झळकताना दिसून येतात. राडा बॉइज अण्णा, आप्पा, वाय बी,भवानी, डब्ल्यू बॉइज असे ग्रुप स्थापन झाले आहेत. त्यांना गुंडगिरीचे बाळकडू या ग्रुपच्या माध्यमातूनच मिळत आहे. ...अन् महाकालीचा एन्काउंटरकधी वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक, दिसेल त्याला मारहाण असे कृत्य करून दहशत माजविणाऱ्या महाकाली राकेश ढकोलिया या गुंडांने २००० मध्ये महाकाली गँग स्थापन करून पोलिसांना जेरीस आणले होते. प्रसंगी तो पोलिसांवरही चाल करून जात होता. जुलै २००८ मध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून बेड्यांसह पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार झाला होता. २०११ मध्ये त्याचा एन्काउंटर करून पोलिसांनी महाकाली टोळी संपवली. त्यानंतर गुंडगिरी कारवाया थांबल्या असा समज झाला असताना, रावण टोळीने डोके वर काढले आहे. ही पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागली आहे.
‘महाकाली’नंतर रावण टोळी पोलिसांची डोकेदुखी
By admin | Published: April 08, 2017 2:00 AM