मुंबई - मागील महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर येत्या २४ तासांत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर १८ जुलैला राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं. परंतु त्याचदिवशी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार होते. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकललं. आता १० ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे.
विधान भवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या ३ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात येऊ शकते. १० ऑगस्टपासून अधिवेशन सुरु होईल. ते दोन आठवडे चालवले जाईल. त्यात १०, ११, १२ ऑगस्ट त्यानंतर शनिवारी १३ ऑगस्टलाही कामकाज करण्याचा निर्णय होऊ शकतो. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन १८ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. दिल्लीवारी करून आलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वेगाने हालचाली करण्यास सुरूवात केली आहे.
नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज रात्री किंवा उद्या सकाळी?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जात होता. मागील महिनाभरात शिंदे यांनी तब्बल ६ हून अधिक वेळा दिल्ली गाठली. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता. खातेवाटपावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्याचसोबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी लांबत चालल्याने विस्तार रखडला असंही बोलले जायचे. परंतु निती आयोगाची बैठक संपवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत परतले.
मोठी बातमी! २४ तासांत शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी?
सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. त्यानंतर आजच रात्री किंवा उद्या सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं गेले. परंतु शपथविधीसाठी इतक्या लगेच व्यवस्था करता येणार नाही असं राजभवनने कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी शपथविधी घ्यायचा झाल्यास तो विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होण्याची शक्यता आहे.