मुंबई – आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज रस्त्यावर उतरत असताना आता धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील जिल्हाधिकारी, तहसिलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं करावी अशी मागणी आहे.
धनगर समाजाचे नेते प्रविण काकडे आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यातील जिल्ह्यात आणि तालुक्यात आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे निवेदन दिले. यात धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊनच मेगा भरती करावी, समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या स्वयंयोजनेबाबत सरकार गप्प का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे पडताळणी निकालात काढावी. दुग्ध व्यवसायात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशुचा दर्जा मिळावा. अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी निवेदन करण्यात आली आहे.
त्याचसोबत धनगर समाजातील मेंढपाळांना चरायासाठी वने आरक्षित करुन पास उपलब्ध करुन देण्यात यावा. चराय अनुदानासाठी १०० कोटींची तरतूद केली मात्र कार्यवाही शून्य झाली. मेंढपाळावरील हल्ल्याबाबत शासनाने त्वरीत कारवाई करावी. निसर्ग चक्रीवादळामुळे व कोरोनाच्या संकटात अडकलेल्या कोकणातील धनगरांना आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
तसेच भाजपा सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळासाठी १ हजार कोटींची घोषणा केली होती. परंतु हा १ हजार कोटींचा निधी कोणाच्या खिशात गेला? याची चौकशी झाली पाहिजे. व तो निधी मेंढपाळांना त्वरीत मिळाला पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या संघटनांनीही त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात महाआघाडी सरकार स्थापन होऊन ८-९ महिने झाले तरी मराठा समाजाच्या महत्त्वाच्या विषयांबाबत मंत्रिमंडळातील कोणीही लक्ष घातलेले नाही. समाजाच्या प्रश्नांवर साधी बैठक देखील घेण्यास ठाकरे सरकारलाच वेळ नाही. सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे.