ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 7 - मराठा समाजातर्फे काढले जाणारे मोर्चे हे अॅट्रॉसिटीच्या विरोधात काढले जावेत, त्यासाठी निधीची अडचण येणार नाही, अशी भूमिका बैठकीत मांडणाऱ्याचा संशय आल्याने बुधवारी कार्यकर्त्यांनी त्याची झडती घेऊन त्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. शेकाप कार्यालयात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हा प्रकार घडला. संदीप गिड्डे (वय ४५, रा. कऱ्हाड) असे त्याचे नाव आहे. त्याचा लॅपटॉप ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यामध्ये संशयास्पद माहिती हाती आल्याचे सांगण्यात आले. घडले ते असे : गेल्या काही दिवसांत कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यात नाशिक, जळगाव, बीड येथे विशाल मोर्चे निघाले होते. या मोर्चाच्या बैठकीस गिड्डे उपस्थित होता. दोन दिवसांपूर्वी तो कोल्हापुरात येऊन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांना भेटला. कोल्हापुरातही मराठा समाजाचा मोर्चा काढा व त्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्या, असा त्याचा आग्रह होता. मोर्चासाठी निधीपासून कशाचीही मदत लागल्यास त्यास अडचण नाही, असे तो सांगत होता. मराठा-दलित समाजात तेढ वाढेल, अशी वक्तव्ये तो करीत होता. त्यामुळे त्याच्या हेतूबद्दल शंका आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अन्य शहरांतील मराठा संघटनांच्या प्रतिनिधींकडे चौकशी केली असता अशी व्यक्ती त्या शहरांतील मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीस उपस्थित होती व अॅट्रॉसिटीविरोधात बोलत होती, असे निदर्शनास आले. तो मंगळवारी (दि. ६) मुंबईत नीतेश राणे, मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकास, तसेच मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनाही भेटल्याचे स्पष्ट झाले.बुधवारी येथील शेकापच्या कार्यालयात झालेल्या बैठकीतही त्याने अशीच वादग्रस्त भूमिका मांडली व त्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी कार्यकर्त्यांना जास्तच शंका आली. बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या डायरीमध्ये माधव भंडारी यांचा मोबाईल नंबर व अन्य काही सांकेतिक भाषेतील माहिती आढळून आली. त्याच्या बोलण्यातही असंबद्धपणा होता. आपण इन्व्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत असल्याचे तो सांगत होता. त्याचा संशय आल्याने त्याला चोप देण्यात आला व साहित्य काढून घेऊन त्याला सोडून देण्यात आले.
मराठा समाज बैठकीनंतर एकास चोपले
By admin | Published: September 07, 2016 11:51 PM