सोलापूर : भविष्यात अभियांत्रिकी शिक्षणाला कौशल्य विकास आणि प्रात्यक्षिक अनुभवाची जोड दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. इस्रोने मंगळयानाची जबाबदारी आमच्यावर टाकली ती यशस्वी करून दाखवली आणि त्यानंतरअन्य देशाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला ‘स्ट्रेन्थ रिस्पेक्ट स्ट्रेन्थ’ हा जगाचा परवलीचा शब्द आहे’ असे मत वैज्ञानिक तथा सर्वोकंट्रोल्स एरोस्पेस इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक दीपक धडोती यांनी व्यक्त केले. वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीमध्ये आयोजित व्याख्यानानिमित्त आलेले धडोती यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखतीत दिली. त्यांनी आपला संघर्षपूर्ण यशस्वी जीवनपट उलगडताना सर्वश्रेय आई सरोजला दिले.
कर्नाटकातील शहापूर हे धडोती यांचे मूळ गाव आहे. बेळगांवीच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ८ नं. शाळेतुन त्यांनी शिक्षणाची सुरूवात केली आणि के.ई.एल. इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल विभागातून पदवी घेऊन बाहेर पडले. शिक्षणाविषयी ते म्हणाले की, कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एकमेव कॉम्प्युटर होता. तो कॉम्प्युटर पहिल्यांदा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जायचा आणि त्यानंतर बी.ई. च्या विद्यार्थ्यांना मिळायचा. मला तो पहाटे ३ ते ६ या वेळेतच अभ्यासाला मिळायचा. त्यावेळेत मी पहिला प्रोजेक्ट केला. त्याला कर्नाटक राज्याने आणि कर्नाटक विद्यापीठाने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले. हा क्षण माझ्यासाठी कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर अमेरिकेच्या मूग कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. भारतासह जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली, हाँगकाँग, सिंगापूर अशा विविध राष्ट्रात मला काम करण्याची संधी मिळत गेली. २0१३ मध्ये मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी संपूर्णपणे भारतीय बनावटीचे यान पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
७५ हजार कि.मीचा अंतराळ प्रवास अनेक गुरूत्वाकर्षणाला समोरे जात यानाचा साडेआठ महिन्याचा प्रवास होता. यामध्ये सोलार पॅनलची डीश आणि अॅन्टेनाचा रिमोटची डीश महत्वाची होती. यानाच्या यशस्वी प्रवासासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सेन्सरची आवश्यकता असते. तर ३२ पैक २७ सेन्सरची निर्मिती आमच्या कंपनीने करून एक यशस्वी मंगळग्रहापर्यंतचा प्रवास जगापुढे आणला आणि आज जगामध्ये भारतीय वैज्ञानिकांनाचा मान वाढला. या यशस्वी मंगळप्रवासाचे श्रेय वैज्ञानिक विक्रमभाई सारा यांनाच दिले पाहिजे, असेही धडोती यांनी सांगितले. देश, परदेशात अभियांत्रिकी क्षेत्राला खुप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी, पेस्टवर भर न देता प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला पाहिजे, असा कानमंत्र देऊन त्यांनी आज अनेक संशोधन विद्यापीठात, महाविद्यालयात पडुन आहेत त्याचे मार्केटींग होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
भारताने १९९८ मध्ये पोखर अणुचाचणी यशस्वी केली. त्यामुळे महासत्ताक अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध टाकले. त्यावेळी इस्त्रोच्या संचालकपदी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम होते. परदेशात काम करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांना डॉ. कलाम यांनी भारतात परतण्याचे आवाहन केले. त्यानुसार मी मायदेशी परतलो. डॉ. कलाम यांनी भाभा संशोधन केंद्रामधील रिअॅक्टरच्या बिघाडाच्या दुरूस्तीची जबाबदारी माझ्यावर सोपवली.ती यशस्वीरित्या पेलल्यामुळे मला सर्वोकंट्रोल्स एरोस्पेस इंडिया प्रा. लि. ची स्थापना करणे शक्य झाले. आज भारताने अवकाशात पाठविलेल्या प्रत्येक सॅटेलाईटसाठी आमच्या कंपनीचे योगदान असते, याचा मला अभिमान आहे.’’