कऱ्हाड : बारावी परीक्षेच्या पाचशे उत्तरपत्रिका गायब असल्याचा भांडाफोड ‘लोकमत’ने केल्यानंतर प्रकरण अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागल्याने अखेर बुधवारी टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत धाव घेतली. पार्सल गहाळ असल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली. गत पाच दिवसांपासून टपाल खाते या गायब उत्तरपत्रिकांचा गुपचूप शोध घेत होते. मात्र, अद्यापही उत्तरपत्रिका हाती न लागल्याने आणि ‘लोकमत’ने या प्रकाराला वाचा फोडल्यामुळे बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेचे दोन गठ्ठे गायब असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यामुळे परीक्षा विभागासह टपाल खात्याची पुरती नाचक्की झाली. हे प्रकरण उजेडात आल्यामुळे टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री कऱ्हाड शहर पोलीस ठाणे गाठले. कऱ्हाडच्या टपाल कार्यालयाचे सहायक अधीक्षक एम. डी. पाटील यांनी याबाबत शहर पोलिसांत खबर दिली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, शिवाजी हायस्कूलकडून आलेली व इतर पार्सल घेऊन मालवाहतूक रिक्षा दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री कऱ्हाडातून सातारला निघाली होती. संबंधित रिक्षावर आयुबखान इस्माईल मुल्ला (रा. सातारा) हा चालक होता. कऱ्हाडातून निघाल्यानंतर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास महामार्गावर एका ट्रक चालकाने रिक्षातून काही पार्सल खाली पडल्याचे आयुबखान मुल्ला याला सांगितले. आयुबखान याने रिक्षासह पाठीमागे जाऊन पाहिले. मात्र, त्याला ते पार्सल मिळाले नाही. साताऱ्यात पोहोचल्यानंतर त्याने ही घटना टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांना फोनवरून सांगितली. सहायक अधीक्षक पाटील यांनी दिलेल्या जबाबानुसार कऱ्हाड शहर पोलिसांत बुधवारी रात्री उशिरा पार्सल गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांच्यासमोर सहायक अधीक्षक पाटील यांचा जबाब नोंदविण्यात आला. पार्सल कसलं माहीत नाही सहायक अधीक्षक पाटील यांनी खबर देताना ‘पार्सल’ गहाळ झाल्याचे म्हटले आहे. ते पार्सल शिवाजी हायस्कूलकडून देण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये काय होते, याबाबत कसलीच माहिती नसल्याचे पाटील यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात चौकशीअंती जबाबदारी ठरविली जाईल. मात्र, सध्या उत्तरपत्रिका शोधण्यास प्राधान्य दिले आहे. कऱ्हाड ते सातारा या मार्गावर सर्वत्र या दोन गठ्ठ्यांचा शोध घेतला जात आहे. याकामी टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.- अभिषेककुमार सिंह,टपाल प्रवर अधीक्षक, सातारा.
‘पेपर गायब’प्रकरणी अखेर पोलिसांत धाव
By admin | Published: March 04, 2015 11:32 PM