योगेश पांडे, नागपूर केंद्रातील मोदी सरकार वर्षपूर्ती साजरी करीत असतानाच सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी नसल्याचा सूर सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात अस्वस्थता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असतानाच प्रमुख केंद्रीय मंत्र्यांनी संघ प्रमुखांच्या भेटीचे सत्र आरंभल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापाठोपाठ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकामागोमाग एक करीत संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीसत्रामागे राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित मुद्दे आहेत. केंद्राच्या वर्षभराच्या कामगिरीबद्दल संघ पूर्णपणे समाधानी नाही. संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या गेल्या काही काळातील वक्तव्यातून ही बाब वारंवार समोर आली आहे. सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनीदेखील यासंदर्भात सूचक विधान केले होते. काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेनुरूप झालेली नाही. त्यामुळे सरकारमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. संघाने विविध विषयांचा समावेश असलेली ७२ मुद्द्यांची यादी मोदी सरकारकडे सोपविली आहे.
मोदींच्या पश्चात संघभेटीचा सिलसिला !
By admin | Published: May 18, 2015 4:55 AM