डिप्पी वांकाणी, मुंबईमुलगी शीना बोरा हिची हत्या केल्यानंतर इंद्राणी मुखर्जी वरळीतील तिच्या नेहमीच्या ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. त्या ब्युटी पार्लरच्या मालकिणीने सांगितले सीबीआयला सांगितले, की २४ एप्रिल २०१२ रोजी सकाळ नऊ वाजण्याच्या सुमारास इंद्राणीने मला अपॉइंटमेंटसाठी फोन केला होता़ (शीनाची हत्या त्याच दिवशी झाली होती.) त्याआधी कारचालक शामकुमार राय याने पोलिसांना सांगितले की हत्येसाठी वापरलेले साहित्य विकत घेतल्यानंतर आपण इंद्राणीला ब्युटी पार्लरपाशी सोडले होते. तेथून ती तीन तासांनी बाहेर आली.मिस अँजेल या ‘चेंज्स लेडी हेअर ड्रेसर’ नावाचे ब्युटी पार्लर चालवतात़ त्या म्हणाल्या की, इंद्राणीला १२-१३ वर्षांपासून मी ओळखत असून, ती नियमितपणे माझ्याकडे येत असे. माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी इंद्राणी लँडलाइनवरून फोन करीत असे. इंद्राणीने २४ एप्रिल २०१२ रोजी फोन केला होता का, असे विचारता त्या म्हणाल्या की, इंद्राणीने अपॉइंटमेंटसाठीच फोन केला असावा. मिस अँजेल या फक्त रोख रक्कमच स्वीकारत असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही रेकॉर्ड किंवा नोंदी नाहीत.आयपीएस अधिकरी देवेन भारती यांनी मोबाइल फोन नंबरचे ठिकाण (लोकेशन) शोधण्याचे आदेश ज्यांना दिले होते, त्या निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी सीबीआयल तपशीलवार निवेदन दिले आहे. पीटर आणि इंद्राणी मुखर्जी या दोघांनी आपण खूप गांभीर्याने शीनाचा शोध घेत आहोत दे दाखवून राहुलची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने भारती यांना शीनाचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. देवेन भारती यांनी मला मोबाइल नंबर देऊन त्याचे ठिकाण शोधण्यास सांगितले होते. मी गुन्हे शाखेतील एक्स प्रोजेक्ट म्हणून परिचित असलेल्या तांत्रिक शाखेला (ही शाखा कॉल डाटा रेकॉर्ड, इंटरसेप्शन, लोकेशन फाइंडिंगचे काम करते) हे काम सांगितले. तो मोबाइल फोन बंद (स्विच्ड आॅफ) असल्यामुळे त्याचे ठिकाण समजू शकत नाही, असे त्या शाखेने कळवले. ही माहिती मी भारती यांना दिली. अलकनुरे म्हणाले की भारती यांनी शीना बोराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खार पोलीस ठाण्याला दिलेल्या एका भेटीमध्ये मला सांगितले होते, की २०१२ मध्ये ज्या फोन नंबरचे ठिकाण शोधायला तुम्हाला सांगण्यात आले होते तो फोन शीनाचा होता.
शीनाच्या हत्येनंतर इंद्राणी पार्लरमध्ये गेली होती
By admin | Published: February 20, 2016 3:01 AM