'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 06:18 PM2019-07-11T18:18:32+5:302019-07-11T18:23:24+5:30
भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजचे एक कोटी ५९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजचे केवळ ५.३ दशलक्ष फॉलोवर्स असून हे देवेंद्र फडणवीस यांच्या फॉलोवर्स संख्येपक्षा कमी आहेत.
- रवींद्र देशमुख
मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दैदिप्यमान यश मिळवले. देशातील सर्वात पावरफुल नेते असलेले मोदी यांचा दबदबा जागतीक पातळीवर आणखी वाढला. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा क्रमांक लागतो. देशात सध्याच्या घडीला हे दोन नेते अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता एका बाबतीत मोदी आणि शाह यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक लागतो.
भारतीय जनता पक्ष सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे भाजपचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. देशात सोशल मीडियावरील फॉलोवर्सच्या बाबतीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांचाच क्रमांक लागतो. मोदी आणि शाह यांचे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. परंतु, या दोघांनंतर फेसबूकवर सर्वाधिक फॉलोवर्सच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक लागतो. याबाबतीत देशातील राजकीय नेत्यांपैकी मोदी आणि शाह यांच्यानंतर फडणवीसच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक पेजचे तब्बल ४४ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. त्यांच्यानंतर अमित शाह यांचा क्रमांक लागतो. शाह यांचे फेसबुकवर १४ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. उभय नेते फेसबुक पेजवर आपल्या रोजच्या घडामोडी मांडत असतात. फेसबुकवरील फॉलोवर्समध्ये शाह यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच क्रमांक आहे. फडणवीस यांचे फेसबुकवर ९.२ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. महाराष्ट्रात एवढे फॉलोवर्स असलेले देवेंद्र फडणवीस एकमात्र नेते आहेत.
फेसबुकवर असलेल्या फॉलोवर्सच्या बाबतीत फडणवीस यांनी केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंह राठोर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या भाजप नेत्यांसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे.
काँग्रेस पक्षाचे ५.३ दशलक्ष फॉलोवर्स
भारतीय जनता पक्ष सोशल मीडियावर नेहमीच काँग्रेसपासून कितीतरी पुढे असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर असलेल्या फॉलोवर्सवरून हे लक्षात येते. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजचे एक कोटी ५९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजचे केवळ ५.३ दशलक्ष फॉलोवर्स असून हे देवेंद्र फडणवीस यांच्या फॉलोवर्स संख्येपक्षा कमी आहेत.