मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून त्यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने जाणाऱ्या मनसेने आता मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी सरकारला करत इशारा दिला. जर भोंगे हटले नाही तर हनुमान चालीसा लावू असा इशारा सभेतून दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
खुद्द मनसे पक्षातूनही राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी समोर आली. मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली तर पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे(MNS Vasant More) यांनी राज ठाकरेंना आदेश झुगारून माझ्या प्रभागात मी लाऊडस्पीकर लावणार नाही अशी भूमिका घेतली. सत्ताधारी पक्षानेही राज ठाकरेंवर चौफेर हल्ला केला. त्यात आता मनसेतील काही मुस्लीम पदाधिकारी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी सरसावले आहेत.
नाशिकपाठोपाठ सोलापूर शहर मनसे अध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. शेख म्हणाले की, राज ठाकरेंनी मुस्लीम समाजाच्या नमाजाला, अजानला विरोध केला नाही. राज्यात शांतता राखावी याचा विचार पहिला राज ठाकरे करतात. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशासाठी चांगले काम करणाऱ्या प्रत्येकाचं राज ठाकरे आदर करतात. इरफान पठाण, सानिया मिर्झासारख्या खेळाडूंचेही कौतुक केले आहे. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. जे पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यांना राज ठाकरे यांची भूमिका समजलेलीच नाही असं त्यांनी सांगितले.
तर नाशिकमध्ये मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सलीम शेख म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाबाबत आदेश यापूर्वीच दिले असून ज्या प्रमाणे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा निकाल मान्य केला, त्याच आदराने या निर्णयाकडे बघायला हवे. मुळातच अजान आणि भोंगे यांचा काही संबंध नाही आणि प्रार्थनेला विरोध नाही हे राज ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे, त्यामुळे त्यांची भूमिका योग्यच आहे. भोंगे लावले नसते तर, हा प्रश्नच उदभवला नसता असं सांगत शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.