जाणुनबुजून कुणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर...; अजित पवारांनी थेट खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:42 PM2023-01-10T13:42:12+5:302023-01-10T13:47:01+5:30

आम्ही शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारे आहोत. सर्व जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे. घटनेनुसार देश चालला पाहिजे. त्यामुळे जो कुणी राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करतात त्यात काहीही अर्थ नाही असं अजित पवार म्हणाले.

After NCP Meeting Ajit Pawar target Shinde-Fadnavis Government | जाणुनबुजून कुणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर...; अजित पवारांनी थेट खडसावलं

जाणुनबुजून कुणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर...; अजित पवारांनी थेट खडसावलं

googlenewsNext

मुंबई - विरोधकांना त्रास देण्यासाठी कुणाला गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर कुणी शांत बसणार नाही. जितेंद्र आव्हाडांवरही खोटे गुन्हे दाखल केले होते. वास्तविक चुका असतील मग त्या कुणाच्याही. त्यावर कारवाई करण्यास दुमत नाही. परंतु कुणालातरी उभं करून खोटा बनाव करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. आम्ही १७ वर्ष सरकारमध्ये होतो परंतु त्यावेळी आम्ही असा प्रयत्न केला नाही. जनता बारकाईने सर्वकाही बघत नाही. आम्ही हे सहन करणार नाही. राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं आहे. 

अजित पवार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर बलात्कार न करता त्याच्यावर गुन्हा दाखल करणे ही मोगलाई लागून गेली. कशाप्रकारे गोवण्यात येते हे लोकांना लक्षात येते. सरकारी यंत्रणेचा वापर करून इतक्या खालच्या पातळीचं राजकारण होत असेल तर आम्ही मूग गिळून गप्प बसलो नाही. आम्हीही आयुधांचा वापर करून त्यांना उत्तर देऊ. सभागृहात आम्ही उचलून धरले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलं. कुठेतरी पाणी मुरतंय हे समजायला हवं असं त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. 

राष्ट्रवादीबाबत गैरप्रचार, अपप्रचार पसरवले जातात 
आम्ही शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारे आहोत. सर्व जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे. घटनेनुसार देश चालला पाहिजे. त्यामुळे जो कुणी राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करतात त्यात काहीही अर्थ नाही. शरद पवारांनी नेहमी राष्ट्रवादीची भूमिका जनतेसमोर स्पष्ट मांडली आहे. कुणाच्या पोटात दुखत असेल म्हणून अपप्रचार, गैरप्रचार करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु आमचा याच्याशी दुरान्वये संबंध नाही असं सांगत राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांना अजित पवारांनी फटकारलं. 

....म्हणून अमोल कोल्हे गैरहजर
अमोल कोल्हे नाशिकला स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेचे चित्रिकरणास आहे. छगन भुजबळ त्यांच्यासोबत होते. मालिका संपेपर्यंत त्यांना तिथून हलता येणार नाही त्यामुळे ते बैठकीस हजर राहू शकले नाहीत त्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊ नये असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले. 

न्यायव्यवस्थेवर भाष्य करणार नाही 
तारखांवर तारखा सुरू आहेत. अडीच महिने प्रकरण सुरू आहे. वकिलांमार्फत बाजू मांडण्याचं काम शिवसेना करतेय. घटनेने, कायद्याने कोर्टाला अधिकार आहेत. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या पुढच्या तारखेवर काही बोलू शकत नाही. न्यायव्यवस्थेने कधी तारीख द्यावी हा सर्वस्वी त्यांना अधिकार आहे त्यामुळे आम्ही भाष्य करू शकत नाही. आम्ही केवळ लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी विनंती करू शकतो असं अजित पवार म्हणाले. 

जातनिहाय जनगणना व्हावी ही पक्षाची भूमिका
ओबीसी जनगणना व्हावी ही पक्षाची भूमिका छगन भुजबळांनी मांडली आहे. जातनिहाय जनगणना इतर राज्य करण्यासाठी पुढे आलेत. जे आकडे मांडले जातात त्यात समाजाची लोकसंख्या किती आहे याची माहिती हवी. गरीब, दुर्लक्षित, वंचित घटकाला न्याय देताना या आकडेवारीचा उपयोग होऊ शकतो. शैक्षणिक फी, योजना राबवण्यासाठी जातनिहाय जनगणना व्हायलाच हवी अशी मागणी अजित पवारांनी केली. 

गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल 
मी प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधिल नाही. तो कुणी इतका मोठा नेता नाही त्याला उत्तर द्यावं. त्याचे डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलंय अशा शब्दात अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला. समाजात काही किंमत आहे का? समाजात त्याच्या शब्दाला काही आदर आहे का? हे पाहून माध्यमांनी समोरच्याला प्रश्न विचारले पाहिजे. शरद पवारांनी कृषी क्षेत्रात जे योगदान दिले त्याची नोंद जगाने घेतली. शेततळे, राष्ट्रीय फलोत्पदान योजना, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना दिलेले प्रोत्साहन हे पवारांचे योगदान विसरला का? वेगवेगळ्या भागात कृषी विज्ञान केंद्र उभारली. संशोधनासाठी कोट्यवधीचा निधी दिला. एकदा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचा म्हणून पहिल्यांदा ७१ हजार कोटी कर्जमाफी यूपीए सरकारच्या काळात पवारांच्या नेतृत्वात दिली होती. एखादा कुणी बालिश प्रश्न, आरोप करत असेल तर उगीच वेळ वाया घालवू नये अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

Web Title: After NCP Meeting Ajit Pawar target Shinde-Fadnavis Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.