मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला भिवंडीमधून सुरुवात होत आहे. आदित्य ठाकरे सत्तानाट्यानंतर ठाण्यात प्रथम शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यानंतर, शहापूर, इगतपुरी येथून नाशिकला रवाना होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मनमाड मधील मेळाव्यापासून होईल. यानंतर येवला, वैजापूर येथेही युवासैनिकांशी संवाद साधणार आहेत.
शिर्डीत करणार समारोप
औरंगाबाद येथे 'शिव संवाद' यात्रेला आदित्य ठाकरे संबोधित करतील. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधतील. पैठण, गंगापूर, नेवासा येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर शिर्डी मध्ये शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील सभांना शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्यानंतर त्यांची शिवसंवाद यात्रा आजपासून महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी सुरु होणार आहे.
दरम्यान, तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी,औरंगाबाद आणि अहमदनगरमधील शिर्डीमधील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. मुंबईतील आदित्य ठाकरेंच्या सभांना ज्या प्रमाणात शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद शिवसंवाद यात्रेत मिळणार का याची वाट पाहावी लागेल.