सोलापूर : गेल्या दीड महिन्यापासून उच्चांकी दराची परंपरा सोलापूरबाजार समितीने कायम ठेवली असून, गुरुवारी कांदा तब्बल प्रतिक्विंटल २० हजार रुपयाने विक्री झाला. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक १५ हजार रुपयाने कांदा विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर बाजार समितीत आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया पंधरवड्यापासून कांद्याला चांगला दर मिळत आहे. राज्यातील अन्य बाजार समित्यांपेक्षा सर्वाधिक दराने कांदा विकला जात आहे. ३० नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९ हजार ५०० रुपयाने कांदा विकला होता. हा दरही अन्य बाजार समित्यांपेक्षा वरचढ होता. डिसेंबर महिन्यात तर दररोज भाव वाढत आहेत. सोमवारी सर्वाधिक प्रतिक्विंटल १३ हजार, मंगळवारी १५ हजार, बुधवारी १५ हजार १०० रुपये तर गुरुवारी तब्बल २० हजार रुपयाने कांद्याचा लिलाव झाला. सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर वाढत असताना अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र दरात फार अशी वाढ झालेली दिसत नाही.
गुरुवारी लासलगाव बाजार समितीत कांदा क्विंटलला सर्वाधिक १० हजार रुपये, अहमदनगरला १५ हजार रुपये, चांदवडला ९ हजार ५०० रुपये, उमराणे बाजार समितीत १३ हजार ५०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १४ हजार ९१ रुपयाने विक्री झाल्याचे सांगण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील गुलाब नदाफ यांचा कांदा प्रतिक्विंटल १७ हजार रुपयाने विक्री झाला.
सात पिशव्या कांदा अन् ६३ हजार रुपये- अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील शिवानंद फुलारी यांनी दोन एकर कांदा लागवड केली होती. दीड एकरापेक्षा अधिक क्षेत्रावरील कांदा काढणी केल्यानंतर अवघ्या ७ पिशव्या कांदा निघाल्याचे शेतकरी शिवानंद फुलारी यांनी सांगितले. यापैकी ६ पिशव्या २० हजार रुपये क्विंटलने विकल्याने ६१ हजार ८०० रुपये तर एक पिशवी अडीच हजार रुपयाने विक्री झाल्याने बाराशे रुपये आले. एकूण ६३ हजार तर खर्च वजा करुन ६२ हजार ६९३ रुपये पट्टी फुलारी यांना मिळाल्याचे अडते अतिक नदाफ यांनी सांगितले.
अन् शेतकºयानेच केला सत्कार- तब्बल २० हजार रुपये क्विंटलने कांदा विकल्याने शेतकरी शिवानंद फुलारी हा भारावून गेला होता. त्याच्या बोलण्यातून हे दिसत होते. कांदा विक्रीसाठी आलेले अनेक शेतकरी गोळा होऊन कौतुकाने पाहत होते. फुलारी यांनी रफिक बागवान व अडते अतिक नदाफ यांचा सत्कार केला.
१४ कोटी ६२ लाखांची उलाढाल- दरात वाढ झाल्याने बाजार समितीची केवळ कांद्याची १४ कोटी ६३ लाख रुपये उलाढाल झाली़ २२५ ट्रकमधून ४५ हजार १२ पिशव्या कांद्याचे २२ हजार ५०६ क्विंटल वजन झाले. डिसेंबर महिन्यातील तीन दिवसात ३८ कोटी २० लाख ७८ हजार रुपये कांदा विक्रीतून उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.