मुंबई : प्रदेश आणि मुंबई अध्यक्ष पदावरील नव्या नियुक्त्यांवरून नाराज असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे परदेश दौऱ्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते काँग्रेसमध्येच राहणार की, वेगळा निर्णय घेणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे.प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर राणे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. राणे यांनी गेल्या महिन्यात पक्षनेतृत्वाला पत्र लिहून पक्ष संघटनेत काही फेरबदल सूचविले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत चव्हाण आणि निरुपम यांची निवड केल्याने राणेंचा चांगलाच हिरमोड झाला. पक्षात जर असेच सुरू राहिले तर वेगळा विचार करावा लागेल. मी घुसमट करून घेत नाही. काही दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर जात असून, त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. दरम्यान, राणे यांनी आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीवरून राणे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. निरुपम यांनीही राणेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
परदेश दौऱ्यानंतर राणे भूमिका घेणार
By admin | Published: March 04, 2015 2:14 AM