सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेताना पोलिसांनी ‘प्लँचेट’चा आधार घेतल्याचा आरोप ताजा असतानाच एका निवृत्त पोलिसाच्या घरी ‘भानामती’ने थैमान घातल्याची घटना दाभोलकरांच्याच साताऱ्यात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. सातारा-मेढा रस्त्यावर असलेल्या ‘विघ्नहर्ता’ गृहनिर्माण वसाहतीत निवृत्त सहायक फौजदाराच्या घरी विचित्र घटनांची मालिका दहा दिवसांपासून सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा करणी किंवा भानामतीचा प्रकार असावा, अशी कुटुंबीयांना धास्ती आहे; मात्र यातील सत्य बाहेर येऊन हे प्रकार बंद व्हावेत, अशीच आपली इच्छा आहे, असे सांगून या कुटुंबाने सत्यशोधनाची परवानगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला स्वेच्छेने दिली आहे.बुधवारी दुपारी काही पत्रकार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांनी विचित्र प्रकार घडत असलेल्या घराची पाहणी केली आणि कुटुंबीयांकडून माहिती घेतली. या माहितीवरून सत्यशोधनाची दिशा निश्चित झाली असून, लवकरच या प्रकाराचा छडा लावला जाईल, असे ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी सांगितले. ‘अशा अनेक घटनांची उकल आम्ही केली असून, हे प्रकारही लवकरच बंद होतील,’ अशी खात्री कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
‘प्लँचेट’नंतर पोलिसांना ‘भानामती’चा विळखा
By admin | Published: August 14, 2014 3:28 AM