मुंबई - राज्यात मागील वर्षी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर वेगवान घडामोडी घडल्या. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह थेट सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले. शिंदे यांच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरेंना जबर फटका बसला. राज्यातील सरकार अल्पमतात आल्यानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-ठाकरे कधीही एकाच व्यासपीठावर दिसले नाहीत. मात्र नवीन वर्षी हा योगायोग जुळून येण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र दिसण्याची शक्यता आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. २३ जानेवारीला हा कार्यक्रम पार पडेल. मात्र यानिमित्तानं शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे नेते एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने त्याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे. त्यासोबतच या कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
२३ जानेवारीला विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे आमंत्रण बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हेदेखील हे आमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत २ गट पडले. त्यात शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राज्यातील सत्ता नाट्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत असून त्यात देवेंद्र फडणवीसही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे गेल्या ५ महिन्यापासून राज्यातील वातावरण जे तापलं आहे त्यावर हे तिन्ही नेते भाष्य करतील का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.