ऑनलाइन लोकमत
भोसरी, दि. 27 - तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेला एकुलता एक मुलगा अपघातात जखमी झाला आणि दुर्देवाने डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. दुःखाचा डोंगर कोसळला, पण अशा दुःखाच्या वेळीही स्वतःला सावरत एकुलत्या एक मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. रुपीनगर तळवडे येथील अमित म्हस्के यांनी समाजासाठी खूप मोठा संदेश देण्याचे काम केले आहे.
तेजस अमीत म्हस्के हा तरुण बुधवार रोजी दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकने गुरुवारी तेजस ब्रेन डेड असल्याची कल्पना नातेवाईकांना दिली. नियतीच्या अशा गंभीर आघाताने म्हस्के कुटुंबीय ढासळून गेले. पण त्यातूनही स्वतःला सावरत तेजसचे वडील अमित म्हस्के यांनी सामाजिक भान जपत मृत्युपश्चातही तेजसला अनंत जीवदान देण्यासाठी देहदानाचा निर्णय घेतला.
तेजसचे डोळे, दोन्ही किडन्या, आणि लिव्हर दान करण्याचे ठरवले. रुबी हॉल रुग्णालयास लिव्हर, एक किडनी थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल तर दुसरी किडनी नाशिक येथील गरजू रुग्णांना दान करण्यात आली. तेजसचे डोळेही अशाच गरजू अंध रुग्णांना दान करण्यात येणार आहेत. नियतीने केलेल्या आघातानंतरही सामाजिक भान जपत अनेकांना जीवनदान देण्याच्या या निर्णयामुळे पिता अमित म्हस्के यांनी समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे. लाखमोलाच्या शरीररूपी संपत्तीचे दान करणे म्हणजे मृत्युपश्चातही अनंत अवयवरूपी जगण्यासारखे आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.
मुलीला घेतले दत्तक...
म्हस्के कुटुंबीयांचे कौतुकास्पद सामाजिक कार्य
तळवडे येथील शेती व पशुपालन करणारे म्हस्के कुटुंबीय मूळचे म्हस्के वस्ती कळस येथील रहिवाशी आहेत. त्यांनी विविध सामाजिक कार्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एका निष्पाप मुलीला दत्तक घेऊन पीडितेचा विवाह थाटात लावून देण्याचे सामाजिक कार्यही त्यांनी केले आहे. त्यांच्या अशा विविध लोकभिमुख कार्यामुळे परिसरात त्यांच्याकडे एक आदर्श नागरिक म्हणून पहिले जाते. त्यातच स्वतःच्या एकुलत्या एक मुलाच्या देहदानाचा निर्णय घेऊन त्यांनी त्यांचे सामाजिक भान अधोरेखित केले आहे.
नियतीचा आघात कायमचा
अमित म्हस्के यांना तेजस आणि तनिष्का हि दोन अपत्ये. नियतीने कायमच या कुटुंबावर आघात केला आहे कारण तनिष्का म्हस्के (वय १५) ही जन्मापासून दृष्टिहीन असून ती मुलींच्या कोथरूड येथील अंधशाळेत दहावीत शिकते. तनिष्काच्या अंधत्वानंतरही समाजासाठी आपण काही देणं लागतो याचे भान ठेवून म्हस्के यांनी वेळोवेळी सामाजिक कामांत पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जागृतीची मोलाची साथ
भोसरीतील जागृती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तेजस चे नेत्रदान झाले असून फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन म्हस्के कुटुंबियांना आधार दिला. रूबी हॉल, व बिर्ला हॉस्पिटल यांच्या मदतीने तेजसचे नेत्र प्रत्यारोपण करण्यासाठी फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे. जागृती मार्फत झालेले हे ४५ वे नेत्रदान असून समाजात नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्याचे काम संस्था यशस्वीपणे करत आहे. म्हस्के यांनी स्वयंप्रेरणेने घेतलेला देहदानाचा निर्णय समाजासाठी खूप मोलाचा आहे असे जागृती चे अध्यक्ष राम फुगे यांनी सांगितले
""तेजाचा अपघाती निधनानंतर आयुष्य उध्वस्त झाल्यासारखे वाटते आहे. तरीही आपण समाजासाठी काही देणं लागतो या भावनेतून आम्ही त्याच्या देहदानाचा निर्णय घेतला. मृत्यू पश्चात तो अवयव रूपाने या जगात राहील या भावनेने आम्ही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाण्याने आम्ही आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे पण त्याच्या अवयव दानामुळे कित्येक जणांना जीवदान लाभल्याने मनाला एक प्रकारचे समाधान लाभते. - अमित म्हस्के ( तेजसचे वडील )