मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या चालक, मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमधून उघडकीस आले. नियम मोडणाऱ्या स्कूल बसविरोधातील कारवाईच्या जाळ््यात गेल्या १० महिन्यांत २६२ स्कूल बस अडकल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र, कारवाई केल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून आले. मुंबईत परवानाप्राप्त शाळेच्या मालकीच्या स्कूल बस आणि करारावरील परवाना प्राप्त स्कूल बसची एकूण संख्या जवळपास ३ हजार ९५ आहे. या बसमधून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन विभागाने नियमावली आखून दिली आहे. त्याला मात्र मुंबईत फाटा देण्यात येत आहे. प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती असणारे रजिस्टर बसमध्ये नसणे, बसच्या मागील आणि पुढील बाजूस स्कूल बस असा उल्लेख नसणे, बसमध्ये महिला मदतनीस नसणे, चालकाच्या खिशावर ओळखपत्र नसणे असे प्रकार वारंवार घडतात. या विरोधात कारवाई करत असल्याचा दावा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून केला जात आहे. एप्रिल २0१५ ते जानेवारी २0१६ दरम्यान आरटीओने नियमांचे उल्लंघन केलेल्या स्कूल बसविरोधात कारवाई केली. यात २६१ बसवर कारवाई करण्यात आली असून, ११२ बस अडकवून ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून ४ लाख ८४ हजार ९८ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यातील एकूणच स्कूल बसवर केलेल्या कारवाईची माहिती घेतल्यास ९ हजार ३४२ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, २ हजार ८४ वाहने ही दोषी असल्याचे आढळले आहे. २0१४-१५ मध्ये हाच आकडा २0१४ एवढा होता, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
कारवाईनंतरही ‘जैसे थे’
By admin | Published: June 29, 2016 1:48 AM