मुंबई : रेल्वे मंत्रलयाने 25 जूनपासून 100 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. या भाडेवाढीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेला मुंबईतून वर्षाला हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. मात्र मुंबईकरांसाठी भाडेवाढीत कपात करण्याचा नव्याने निर्णय घेतल्यामुळे या दोन्ही रेल्वेला तब्बल 950 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे रेल्वे अधिका:यांकडून सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेला मेल-एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकलमधून 2012-13 मध्ये 2 हजार 618 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर मध्य रेल्वेलाही याच वर्षात 2 हजार 622 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. उपनगरीय लोकल सेवांमधून मध्य रेल्वेने 606 कोटी 3 लाख रुपये आणि पश्चिम रेल्वेने 561 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2013-14 मध्ये या दोन्ही रेल्वेची जवळपास एवढीच कमाई आहे. रेल्वेने नुकताच 100 टक्के दरवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात आणखी भर पडणार होती. या नवीन भाडेवाढीची 25 जूनपासून अंमलबजावणी केली जाणार होती. या निर्णयामुळे लोकल सेवेच्या तिकीटदरात साधारण पाच रुपयांची वाढ होती. मात्र पासांचे दर दुप्पट झाले होते. या दरवाढीमुळे पश्चिम रेल्वेला वर्षाला 1 हजार 100 कोटी रुपये, तर मध्य रेल्वेला 1 हजार 300 कोटी रुपये वाढीव उत्पन्न मिळणार होते. मात्र 100 टक्के दरवाढीला विरोध करण्यात आल्यामुळे यात बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रलयाने घेतला. त्यानुसार 14.2 टक्के दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेच्या या निर्णयाचा मोठा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेलाच बसला. पश्चिम रेल्वेला आता साधारण 400 कोटी रुपये, तर मध्य रेल्वेला 550 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.