मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे सध्यातरी बंडखोरांचे बंड शांत झाले असं चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनअजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि अजित पवारांची माघार यामुळे सरकार स्थापनेत अडचण आली नाही. मात्र राष्ट्रवादीत धुमसत असलेली बंडाची आग शांत झाली, असं म्हणणे अद्याप कठीण आहे.
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे अनेकांना वाटले की, काका शरद पवार यांच्याविरुद्ध अजितदादांनी बंड पुकराले. मात्र आपण केवळ भूमिका घेतली होती, असं सांगून ते बंड नव्हतं असं अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना तसेच पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
खुद्ध सुप्रिया सुळे यांनी व्हाट्स अॅप स्टेटसवर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे कुटुंबात आणि पक्षात फूट पडल्याचे त्यांनी नमूद केले होते. तर कार्यकर्त्यांमधून राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडेच येणार असं चित्रही निर्माण झालं होतं. त्यातच सुप्रिया सुळे शरद पवारांच्या साथीत मैदानात उतरल्या आहेत. यामुळे या चर्चांना बळ मिळात आहे.
सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींमध्ये सुप्रिया आघाडीवर दिसल्या. आमदारांच्या शपथविधीच्या दिवशी त्या जातीने गेटवर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित सर्वच पक्षांच्या आमदारांचे स्वागत केले. तर नव्याने निवडून आलेल्या आमदारांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्यातही त्या आघाडीवर दिसत होत्या. या व्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांची दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांच्या संदर्भातील एक पोस्टही आली होती.
एकूणच अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली तर सुरू झाल्या नाही ना, अशा चर्चा रंगत आहे. यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.