ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - शिवसेना मुखपत्र सामनामध्ये आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्रानंतर नाराज मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना बोलावणं पाठवलं होतं. खासदार प्रतापराव जाधव, संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. दरम्यान व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंनी सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी केला आहे. शिवसेना गटनेते एकनाथ शिंदेदेखील मातोश्रीवर गेले आहेत.
सामनातील व्यंगचित्रामुळे शिवसेनेच दुफळी निर्माण झाल्याचं दिसलं होतं. व्यंगचित्रामुळे नाराज झालेले बुलढाण्यातील खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर आणि आमदार रायमूलकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला होता असं वृत्त होतं.
सामनामध्ये राज्यभरात निघणा-या मराठा क्रांती मोर्चाविषयी एक व्यंगचित्र छापून आले होते. या व्यंगचित्रावर मराठा समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. व्यंगचित्रातून समाजातील महिलांचा अवमान झाला अशी टीका सुरु झाली होती.
उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल -
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये छापलेल्या व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. विष्णु नवले यांनी व्यंगचित्राप्रकरणी परभणीच्या नानल पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंची दिलगिरी -
‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीतील माझ्या एका व्यंगचित्राने सध्या काहूर माजले आहे. विशेषत: मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रामुळे दुखावल्या व त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं श्रीनिवास प्रभुदेसाई बोलले आहेत.
इरादे मेरे हमेशा साफ होते है...
‘इरादे मेरे हमेशा साफ होते है, इसलिए कई लोग मेरे खिलाफ होते है’ अशा आशयाचा सूचक मजकूर ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी फेसबूकवर शेअर केला. राऊत अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रि या देतात. या वेळी मात्र त्यांनी दोन दिवसांनंतरही मौन बाळगणे पसंत केले.
हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा विघ्नसंतोषीपणा : देसाई
सामनामधील व्यंगचित्राचा वाद निवळलेला असताना वातावरण पुन्हा पेटविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केला. या दोन पक्षांच्या नेत्यांनी गेली १५ वर्षे सत्ता भोगताना मराठा समाजासाठी कोणतीही ठोस योजना आणली नाही. आरक्षणाचा फार्स केला. ही नामुष्की लपविण्यासाठी आता ते शिवसेनेवर आगपाखड करीत आहेत. मराठा क्रांती मोर्चांमध्ये डौलाने फडकणारे भगवे झेंडे विरोधी पक्षांना बघवत नसावेत. विरोधकांचा विघ्नसंतोषीपणा जनता खपवून घेणार नाही व मराठावीर विचलित होणार नाहीत, असे देसाई यांनी म्हटले आहे.
सामना कार्यालयांवर हल्ला
नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त व्यंगचित्रामुळे ठिकठिकाणी ‘सामना’ पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.
माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी पेटवत आहे. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.