मुंबई - सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीदरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यात वाद पेटला होता. आज लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालांमध्ये भाजपा समर्थित पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तसेच नितेश राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेणारे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनाही पराभवाचा धक्का बसल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावणर आहे. दरम्यान, सतीश सावंत आणि महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंनी फेसबुकवरून एका शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.'
मारहाण प्रकरणात आरोप झाल्यापासून आमदार नितेश राणे हे भूमिगत आहेत. तसेच त्यांनी सोशल मीडियावरूनही कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र आता अत्यंत चुरशीच्या लढतीत सतीश सावंत पराभूत झाल्यानंतर नितेश राणेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच एक फोटो शेअर करून ‘गाडलाच’ असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये खाली पडलेल्या सतीश सावंत यांच्यावर नितेश राणे उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत यांचे समर्थक असलेल्या संतोष परब यांना मारहाण केल्याचा आरोप झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण संवेदनशील बनले होते. तसेच या प्रकरणात आरोपांची सुई नितेश राणेंपर्यंत पोहोचली. त्यामुळे नितेश राणेंना अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घ्यावी लागली होती. मात्र तिथे राणेंना दिलासा मिळाला नव्हता. पण आज लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालांमध्ये नितेश राणेंना मोठे यश मिळाले असून, भाजपा समर्थित सिद्धिविनायक सहकार पॅनेलने या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
दरम्यान, वादविवाद, मारहाण प्रकरण आणि कोर्टकचेरी यामुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा गेल्या आहेत.