नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. राऊतांच्या अटकेनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संजय राऊत याचा मला अभिमान आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. तर दुसरीकडे राऊत जेलमध्ये गेल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन चालकाने पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत जात खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. राजपूत यांनी श्रीकांत शिंदेंना पुष्पगुच्छ आणि पेढे दिले. संजय राऊतांच्या अटकेनंतर राजपूत यांनी आनंद व्यक्त केला. संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम केले असा आरोप राजपूत यांनी केले. संजय राऊत जेलमध्ये गेले त्याबद्दल मी खूप खुश आहे. शिवसेना संपवण्याचं काम राऊतांनी केले असा गंभीर आरोप त्यांनी केला. मी १९९३ ते २००० पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वाहन चालक होतो. संजय राऊत यांच्या चुकीच्या कामामुळे शिवसेना संपवली असा आरोप त्यांनी केला.
पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय...महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, महाराष्ट्रावर हल्ले होतायेत पेढा वाटा, बेशरम लोक आहात तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती.
१० लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तब्बल ९ तास ईडीचे अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी होते. संजय राऊतांना ईडीने अटक केली. परंतु या प्रकरणात एक ट्विस्ट आला जेव्हा रविवारी संजय राऊतांच्या घरी ईडीने धाड टाकली. तेव्हा ११.५० लाख रुपये रोकड सापडले. यात १० लाखांच्या बंडलांवर एकनाथ शिंदे आणि अयोध्या असं नाव होते. शिवसैनिकांनी जमवाजमव करून हे पैसे गोळा केले होते. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौरा केला होता तेव्हा त्या खर्चाचे पैसे राऊतांकडे होते. हे पैसे पुन्हा पक्षात परत द्यायचे होते असं संजय राऊत यांच्या भावाने सांगितले.