Aaditya Thackeray on Sridhar Patankar ED Raids: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्स (सदनिका) जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. PMLA कायद्यानुसार ईडीने ठाण्यात ही कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतेमंडळी यांच्या यावर प्रतिक्रिया आल्या. श्रीधर पाटणकर हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंचे मामा आहेत. त्यामुळे आपल्या मामांवर ईडीने केलेल्या कारवाईबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
"मला तुमच्याकडून येणाऱ्या प्रश्नांची माहिती आहे. सध्या जे काही घडलंय याबद्दल माझ्यापर्यंत फार त्रोटक माहिती आलेली आहे. आम्ही सारेच आतापर्यंत विधिमंडळात होतो, हाऊसमध्ये नेटवर्क नसतं हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही माहिती आहे. त्यामुळे मला या प्रकरणाबद्दल आता तरी नीटशी कल्पना नाही. मला या साऱ्या प्रकरणावर नीट माहिती घेऊ दे आणि मी मग तुमच्याशी बोलेन"; अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.
या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मत मांडलं. "सध्या देशात या सगळ्या साधनांचा जो गैरवापर होत आहे, तो देशासमोरील मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी राजकीय हेतुने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर ५ ते १० वर्षांपूर्वी ईडी ही संस्था नक्की काय आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नव्हतं. पण आता मात्र ईडी संस्था गावागावात फिरत आहे", असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. "ईडीच्या कारवाईची संसदेत माहिती समोर आली. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता नाही तिथंच ईडीच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे", असं संजय राऊत म्हणाले.