पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची रिघ वाढली आहे. अजित पवारांच्या गटातून काही नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेऊन सुप्रिया सुळेंच्या कारमधून फाईलीआड चेहरा लपवणाऱ्या नेत्याचे नाव चर्चेत आले आहे. एका मोठ्या नेत्याने शरद पवारांची काल पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर सुप्रिया सुळेंच्या कारमधून एक व्यक्ती चेहरा लपवून जाताना दिसली त्यावेळी माध्यमात उलटसुलट चर्चा होऊ लागली.
सुळेंच्या कारमधून बाहेर पडलेल्या त्या व्यक्तींबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले. त्यात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे नाव आघाडीवर आहे. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी फाईल लपवणारी ती व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याचा दावा केला. राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले होते परंतु राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा घरवापसी करत शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायेत असं बोललं जाते.
राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात शिंगणे यांनी नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो असं विधान करत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केले होते. वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले होते. आयुष्यभर शरद पवार यांचा ऋणी राहणार असून त्यांनी नेहमीच सहकार्य केल्याचे शिंगणे यांनी म्हटलं होते.
काय म्हणाले राजेंद्र शिंगणे?
"३० वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचे मी मान्य करतो. आयुष्यभर मी निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्यासोबत गेलो. आता राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले आहेत. परंतु निश्चितपणे शरद पवार हे नेहमीच माझ्यासाठी आदरणीय राहतील असं राजेंद्र शिंगणे यांनी विधान केले होते.
तर सगळ्या पक्षाचे लोक शरद पवारांविषयी चांगले बोलतात ते आमचे भाग्य. राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात. शिंगणे कुटुंबासोबत आमचे अनेक दशकांचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. राजेंद्र शिंगणे यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. शिंगणे बँकेच्या अडचणीमुळे अनेक वर्ष अस्वस्थ होते. ते संवेदनशील नेते आहेत. त्यामुळे बँकेत काही अडचणी, आव्हाने होती. जनतेला काही अडचण होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष ते आमच्यासोबत राहिलेले आहेत असं त्यावेळी सुपिया सुळेंनी शिंगणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती.