शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल?; एकनाथ शिंदेंच्या धमाक्याचा आवाज दिल्लीपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:56 PM2022-06-21T15:56:53+5:302022-06-21T16:19:37+5:30
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते.
शिवसेनेत बंडाचे वारे सुरु झाल्याने सकाळपासून राज्यातील वातावरण पुरते हादरलेले असताना आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी येत आहे. काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. यामुळे काँग्रेसने सर्व आमदारांना दिल्लीत बोलविणे पाठविल्याची माहिती मिळत होती. मात्र, अचानक शिवसेनेतील वादळाची बातमी धडकली आणि काँग्रेस मागे पडली होती.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते. या साऱ्या घडामोडींवर काँग्रेसने आपल्या आमदारांना तातडीने मुंबईला बोलविले आहे. तसेच दिल्लीतून प्रभारी देखील नियुक्त करण्यात आला आहे.
यातच काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल असल्याचे वृत्त होते. मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळले आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. काही आमदार नॅाट रिचेबल असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. आता, शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे.