पनवेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन झाले आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट गेले आहेत. मात्र अद्यापही उद्धव ठाकरेंकडून अनेक पदाधिकारी शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. त्यातच आता अन्य पक्षातील पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत आहेत.
शिवसेनेपाठोपाठ आता मनसेलाही शिंदे गटाने खिंडार पाडलं आहे. पनवेल, उरण आणि खारघर भागात अंतर्गत वादातून मनसेचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. मागील ८ वर्षापासून ते जिल्हा अध्यक्षपदावर कार्यरत होते. मनसेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह एकूण ६५ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. मनसेमधली अंतर्गत धुसफूस यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आले आहे.
मनसे उपतालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीरपणे शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी, विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतर सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीतही मनसेने त्यांचे मत एनडीएच्या उमेदवाराला दिले होते. त्यानंतर अशाप्रकारे मनसेचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी केल्यानंतर मनसे आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झाले नसते, असे सांगत संजय राऊत यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचेच आहे माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटले उगाच फुकटचे श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. याचे श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावे लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचे तुम्ही श्रेय कसे काय काढून घेऊ शकता? कारण त्यांच्यामुळे हे काय एकदा घडले नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.
गरज पडली तर शिंदे गट मनसेत विलिन करण्यावर विचार करेनएकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन असे राज ठाकरे म्हणाले होते.