मुंबई : शाळेला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर शाळेचे प्लॅनमधून नॉनप्लॅनमध्ये रूपांतर केले जाते. पण गेल्या १२ वर्षांत हे रूपांतर न केल्यामुळे मुंबईतील २ हजार ४०० प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा करावी लागायची. १२ वर्षांनंतर आता प्रतीक्षा संपली असून वेळेवर पगार मिळणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर पहिली पाच वर्षे ‘प्लॅन’मध्ये असते. त्यामुळे या वर्षांत शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा राज्य शिक्षण आणि वित्त विभागाने दिलेल्या निधीतून दिला जातो. निधी उपलब्ध असेपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळतो. सर्वसाधारणपणे मे ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत पगार नियमित मिळतात. पण त्यानंतर निधीची कमतरता भासायला लागते. या वेळी वारंवार पाठपुरावा करूनही दोन ते तीन महिने पगार रखडतात. गेल्या १२ वर्षांपासून प्लॅन शाळांचे रूपांतर ‘नॉनप्लॅन’मध्ये न केल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. अखेर सर्वच शाळा नॉनप्लॅन होणार असल्याने पगाराची प्रतीक्षा संपेल, असा विश्वास मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
एका तपानंतर २,४०० शाळांचा प्रश्न अखेर सुटला
By admin | Published: March 20, 2017 3:38 AM