अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना घेराव; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 04:28 PM2024-03-20T16:28:57+5:302024-03-20T16:29:35+5:30
युगेंद्र पवार सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत.
बारामती - लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवारविरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. त्यात अजित पवारांविरोधात त्यांच्या घरातील सख्ख्या भावासह इतर मंडळी उतरली आहेत. त्यात आता अजित पवारांची सोशल मीडियावर होणारी बदनामी पाहून काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला.
युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घालत अजितदादांची सोशल मीडियात बदनामी करणाऱ्यांना आवर घाला अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असं आश्वासन दिले. सोशल मीडियात श्रीनिवास पवारांचे भाषण सध्या व्हायरल होतंय. त्यामुळे अजितदादा समर्थक जाब विचारण्यासाठी आले होते.
युगेंद्र पवार सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. तर पवार कुटुंबातील इतर मंडळीही सुप्रिया सुळेंच्या प्रचारात गुंतले. त्यात नुकतेच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी काही गावकऱ्यांशी संवाद साधला. त्या संवादात श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर माध्यमांमध्ये हा व्हिडिओ समोर आला. तेव्हापासून बारामतीत अजित पवारांचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे कार्यकर्ते यांच्यात कुरघोडी सुरू असल्याचं बोललं जाते.
काय म्हणाले होते श्रीनिवास पवार?
श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत येत गावकऱ्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मी अजित दादांच्या विरोधात कसा बोलतोय. मी नेहमी दादांसोबत राहिलो. चांगल्या काळात, वाईट काळात पण मी त्याची साथ दिली. तो म्हणेल तशी मी तिथे उडी मारली. त्याने जे जे निर्णय घेतले त्याला साथ दिली. कधी मी त्याला विचारले नाही की असे का? पण जेव्हा आमची चर्चा झाली. तेव्हा मी त्याला म्हटले आमदारकी तुझ्याकडे आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. साहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. गावकरी म्हणून सगळ्यांना माहितीयेत. साहेबांचे वय आता ८३ झाले, त्यांना सोडणे मला पटले नाही. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. का तर आपण पुढची १० वर्षे दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, याच्यासारखा नालायक माणूस नाही, असे माझे वैयक्तिक म्हणणे आहे असं पवार म्हणाले होते.