Ajit Pawar on Rajokt Fort :सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास हा पुतळा अचानक कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. विरोधकांनीही महायुती सरकारला धारेवर धरलं. दुसरीकडे वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरवलं आहे. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. नट बोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. तर वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास होता. त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. महाविकास आघाडीने आता या प्रकरणावरुन सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाराचार झाल्याचा आरोप मविआने केला आहे. तर पुतळा कोसळ्याच्या घटनेप्रकरणी अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागतो, असं अजित पवार यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा अहमदपूर येथे आली असताना त्यांनी माफी मागितली.
"दोन दिवसांपूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा वाऱ्यामुळे कोसळला. त्यासंदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी केली जाणार आहे. ते कुणी केलं त्याचा तपास लागला पाहिजे. त्यासंदर्भात राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवताचा पुतळा वर्षाच्या आत कोसळणे हे सगळ्यांना धक्का देणारे आहे. काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. आपल्या इथे कायदे नरम आहेत," असं अजित पवार म्हणाले.
राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राजकोट किल्ल्यावर जोरदार राडा
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मविआ नेत्यांमध्ये आणि खासदार नारायण राणे यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही गटाचे नेते एकाच वेळी तिथे पोहोचल्यानंतर ठाकरे-राणे समर्थक भिडले. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले होते. किल्ल्याच्या प्रेवशद्वारावर राणेंनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर दोन तासांनी मविआचे नेते किल्ल्याच्या बाहेर पडले.