लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा ५ टक्यांपेक्षा कमी असेल, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्यांपेक्षा कमी भरलेले असतील अशा शहरातील व्यवहार सोमवार पासून सुरळीत करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातही मागील आठवड्यापासून काही निर्बंध शिथील करण्यात आले आले आहेत. विशेष म्हणजे दर आठवड्याला प्रत्येक शहरांचा रुग्णदरवाढीचा आणि ऑक्सिजन बेडचा आढावा घेऊन त्यानंतर निर्बंध आणखी शिथील करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार या शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत ठाणे शहर, नवी मुंबई पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली देखील आता दुसऱ्या स्तरात आले आहे. कल्याण यापूर्वी तिसऱ्या स्तरात होते. परंतु आता येथील रुग्णवाढ कमी होत असल्याने हे शहर देखील आता दुसऱ्या स्तरात आले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत रुग्णवाढ कमी होत असली तरी आजही रुग्णवाढीचा दर हा ७.७७ टक्के एवढा आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख ३३ हजार ०७४ कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील १ लाख २९ हजार ०९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत १ हजार ९९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला ९८८ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.७४ टक्के एवढे आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा आता ११०६ दिवसांवर गेला आहे. दरम्यान आता कल्याण डोंबिवलीतही मागील आठवडाभरात रुग्णवाढ कमी झाल्याने हे शहर आता तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर आले आहे.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली (स्तर -२)
काय सुरु आणि काय बंद राहील
५० टक्के हॉटेल सुरु राहणार, मॉल चित्रपटगृह -५० टक्के, दुकाने पुर्ववत, लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेकरीता, सार्वजनिक ठिकाणो, मैदाने, सर्व खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये, विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशा वेळेत सुरु राहतील, चित्रिकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती मर्यादा, अंत्यविधीसाठी बंधन नसेल, जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने परवानगी, लग्न सोहळ्यासाठी 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी, सार्वजनिक वाहतुक १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील, तर धार्मिक स्थळे, लोकल प्रवास बंद राहणार आहे.