महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९६.०१ तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के लागला आहे.
१४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची ९१.२५ टक्के एवढा आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे.
बारावीच्या या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन. बारावी नंतर आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी एखाद्या विशिष्ट क्षेत्राची निवड करायची असते. यासाठी उत्तम गुण मिळवण्यासाठी विशेष मेहनत विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. आजचा निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीचे फळ आहे. प्रयत्न, जिद्द व मेहनतीने नक्कीच यशाची शिखरे गाठता येतात. आपल्या प्रयत्नांसोबत कुटुंबाचे पाठबळ देखील महत्वाचे असते म्हणून विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबाचे देखील अभिनंदन, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी परिक्षेत अपयश मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील आवाहन केलं आहे. परीक्षा एक टप्पा आहे. यात यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी देखील खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा सुरुवात करावी. आजचा विद्यार्थी वर्ग महाराष्ट्राचे प्रगत भवितव्य घडविणारा असून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
निकालाची टक्केवारी घसरली-
यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला असला तरी टक्केवारीचा टक्का मात्र घसरल्याचे दिसून येत आहे. २०२१ आणि २०२२ च्या निकालापेक्षा यंदा कमी निकाल लागला. गेल्या चार वर्षांमधील एकूण निकाल पाहता २०२१ मध्ये सर्वाधिक ९९.६३ टक्के निकाल लागला. त्यात कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांचा निकालाही २०२१ मध्ये ९९ टक्क्यांच्या वरच होता. पण यंदा केवळ विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के तर इतर शाखांचा निकाल कमी लागला आहे. त्यात कला शाखा ८४.०५, वाणिज्य ९०.४२, व्यवसाय अभ्यासक्रम ८९.२५ टक्के आहे.